विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी 8 ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याचे आवाहन
विशेष मतदार यादी पुनरीक्षणासाठी 8 ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरण्याचे आवाहन...
मुंबई, दि.27(डि-24 न्यूज)- : महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision) कार्यक्रम सुरू असून, सध्याच्या मतदार यादीतील सर्व मतदारांनी 8 ऑगस्ट 2026 पर्यंत गणना अर्ज भरून तो संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे जमा करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. या अर्जावर स्वाक्षरी करून सादर करणाऱ्या मतदारांची नावे 17 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ज्या पात्र मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत आढळून येणार नाहीत किंवा नव्याने मतदार म्हणून नोंदणी करावयाची असेल, त्यांना 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2026 या कालावधीत नमुना क्रमांक 6 (घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रांसह) भरून अर्ज करता येणार आहे. संबंधित अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील.
या कालावधीत मतदार यादीतील नोंदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्रमांक 8, तर कोणत्याही नावावर हरकत घेण्यासाठी नमुना क्रमांक 7 भरता येणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची माहिती अथवा खोटे निवेदन दिल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 31 नुसार संबंधित व्यक्तीस एक वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम २२ आणि २३ नुसार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदींमध्ये आवश्यक सुधारणा अथवा नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. ही सतत अद्ययावत (Continuous Updation) प्रक्रिया असून, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत आवश्यक बदल करता येतील. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी आपल्या नावाची मतदार यादीत नोंद असल्याची खात्री करून आवश्यक कार्यवाही वेळेत करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
What's Your Reaction?