शहराची वाहतूक कोंडी दूर होणार, पार्कींग पाॅलिसी आणणार महापालिका

शहराची वाहतूक कोंडी दूर होणार, पार्किंग पाॅलिसी आणणार महापालिका...
मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांची माहिती...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) - शहरात वाहतूकीची समस्या गंभीर समस्या झाली आहे. शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने स्मार्ट पार्किंग पॉलिसी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादच्या धर्तीवर ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट अशा दोन्ही प्रकारच्या पार्किंगच्या सुविधा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ॲपद्वारे ॲडव्हॉन्समध्ये पार्किंगची जागा आरक्षित करून ठेवता येणार आहे. आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल., अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली. बुधवारी पोलीस आयुक्तालयात मनपा व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. स्मार्ट सिटीचे प्रकल्प अधिकारी फैज अली यांनी पार्किंग पॉलिसीचे सादरीकरण करण्यात आले.
शहरातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते असोत किंवा मुख्य बाजारपेठेत पार्किंगची सर्वात मोठी समस्या निर्माण झालेली आहे. सणासुदीच्या काळात तर वाहतुक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कुटुंबासोबत मनसोक्तपणे खरेदीचा आनंदही घेता येत नाही. शहरात येणाऱ्या पर्यटकांनाही याचा फटका बसतो. या सर्व बाबींचा विचार करता, मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी पीपीपी तत्त्वावर पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की पार्किंगचे तासानुसार स्लॉट असतील. एक दिवस, महिना किंवा वर्षभरासाठी पार्किंग बुक करता येईल. ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने बुकिंग व पेमेंट करता येईल. जड वाहनासाठी पार्किंगची वेगळी सुविधा असेल. तसेच व्यापारी आपल्या दुकानासमोरील जागा कर्मचाऱ्यांसाठी किंवा ग्राहकांसाठी बुक करू शकतील. पार्किंग पॉलिसीतून सुमारे दिड हजार जणांना रोजगार मिळेल. यात 75 टक्के महिला कर्मचारी व 25 टक्के पुरुष कर्मचारी, ट्रान्सजेंडर यांना नियुक्त करण्याचे बंधन एजन्सीवर राहणार आहे. शक्य तितक्या लवकर हि पॉलिसी राबविण्यात येईल.
एजन्सी सर्वे करून निवडणार जागा
स्मार्ट पार्किंग ॲपचा डीपीआर तयार करण्यात आला आहे, पार्किंग पॉलिसीत ऑन स्ट्रीट आणि ऑफ स्ट्रीट असे दोन प्रकार राहतील. याठिकाणी वाहनांचा विमाही राहील. रस्त्यालगत असलेल्या कोणकोणत्या जागा पार्किंगसाठी योग्य राहतील, याचा सर्वे निवड झालेली एजन्सी करेल. तर ऑफ स्ट्रीट पार्किंगसाठी विद्यमान पार्किंग तळाच्या जागा वापरण्यात येतील.
औरंगपुरा ते गुलंमडी असो किंवा बाजारपेठेतील इतर रस्त्यावर पार्किंगच्या जागेतच दुकाने थाटण्यात आलेली आहेत. परवानगी घेवून बांधकाम केल्यानंतरही पार्किंगसाठी जागा सोडलेली नाही, याकडे मनपा आयुक्तांचे लक्ष वेधले असता, आम्ही त्यांना सुधारणा व दुरुस्ती करायला लावू. महापालिकेने दिलेल्या बांधकाम परवानगीची अंमलबजावणी करा, अशा सूचना त्यांना करण्यात येतील., असे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले.
स्मार्ट पार्किंग पॉलिसीसंदर्भात पोलीस आणि मनपाची एकत्र बैठक झाली. आम्ही वाहतुकीच्या संदर्भातील मुद्दे चर्चेला नेले. त्यात आधी नो पार्किंग झोन जाहीर करा, पार्किंगचे शुल्क नागरिकांना परवडणारे म्हणजे कमीत कमी ठेवा, हॉकर्स झोन निश्चित करा, चोरीच्या गाड्यांची माहिती पोलिसांना मिळण्यासाठी पार्किंगच्या जागेत आरएफआयडी रिडींग ठेवा, आदी सुचना केल्या आहेत. तसेच, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमले आहे.
What's Your Reaction?






