महीला सक्षमीकरण अभियान, विधवा नव्हे पुर्णांगिनी म्हणा - रुपाली चाकणकर

महिला सक्षमीकरण अभियान; महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा...
‘विधवा’नव्हे ‘पुर्णांगिनी’म्हणा- रुपाली चाकणकर...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.13(डि-24 न्यूज)- पती सोबत संसार करतांना ती ‘अर्धांगिनी’ असते मात्र पतीच्या निधनानंतर ती एकटीच दोघांचीही जबाबदारी सांभाळते. त्यामुळे तिला ‘विधवा’ न म्हणता ‘पुर्णांगिनी’ म्हणा आणि तिचा सन्मान करावा,असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर ह्यांनी आज येथे केले. संबोधनातील हा बदल करण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाने शासनाला शिफारसही केली आहे, असेही यावेळी श्रीमती चाकणकर यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने जिल्ह्यात ‘महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ‘महिला अधिकाऱ्यांची कार्यशाळा’ आयोजीत करण्यात आली.
या कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती रुपाली चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपजिल्हाधिकारी डॉ. सुचिता शिंदे, संगिता राठोड, नीलम बाफना, महिला व बालविकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुवर्णा जाधव तसेच सर्व शासकीय विभागातील महिला अधिकारी उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात झाली.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, महिलांनी स्वतःला आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. उगाचच उपवास करु नका. आपण प्रशासकीय यंत्रणेतील घटक म्हणून समाजाला बांधील आहोत. आपण आपल्या पदावर काम करतांना सोबतच्या महिलांना जागरुक करु शकतो. असे करत असतांना समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.
श्रीमती चाकणकर पुढे म्हणाल्या की, समाजात आजही विधवा महिलांना अवहेलना सहन करावी लागते. वास्तविक विधवा महिला ह्या आपल्या कुटुंबात आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यामुळे त्यांना अधिक सन्मान दिला पाहिजे. राज्य महिला आयोगाने विधवा हा शब्द हटवून त्या ऐवजी ‘पुर्णांगिनी’ हा शब्द वापरावा अशी शिफारस शासनाला केली आहे. समाजाचा हा दृष्टीकोन बदलविण्याचा सावित्रीमाईंनी सुरु केलेला हा लढा अजूनही अपूर्ण आहे, तो आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. समाज बदलासाठी महिला अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. महिलांनी आपले आयुष्य सकारात्मकतेने जगा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित महिलांना केले.
त्यांनी महिला अधिकाऱ्यांना सांगितले की, बालविवाह, गर्भलिंगनिदान चाचण्या, विधवाप्रथा विरोधात लढा द्या. आपल्या कार्यालयातील अंतर्गत तक्रार निवारण समिती तयार करण्याबाबत आग्रही रहा. भारतीय न्याय संहिता या 1 जून 2024 पासून अंमलात आलेल्या कायद्यांसंदर्भात माहिती जाणून घ्या. ही माहिती शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवा. विविध शासकीय योजना, टोल फ्री क्रमांक याबाबत जनजागृती करा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार त्यांनी आपल्याला दिलेला आत्मसन्मान, कायदा, हक्क, अधिकार समजून घेऊन सक्षम व्हा. आयुष्यातील संकटांच्या लढाईला सामोरे जा. स्वतःच्या आरोग्य्याची काळजी घ्या, असा हितोपदेशही श्रीमती चाकणकर यांनी उपस्थित महिला अधिकाऱ्यांना केला.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना ह्यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध महिला सक्षमीकरण उपाययोजनांबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात महिला सुरक्षिततेसाठी 500 हून अधिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला बचत गटांमार्फत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात 65 हजार महिला ह्या लखपती दिली झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, महिलांनी अपप्रवृत्तीच्या विरोधात उभे रहायला शिकावे व प्रवृत्त व्हावे, यासाठी महिला सक्षमीकरण अभियान आहे. त्याची सुरुवात शासकीय महिला अधिकाऱ्यांपासून व्हावी यासाठी ही कार्यशाळा आहे. महिलांची सुरक्षितता, त्यांचे सक्षमीकरण याबाबतच्या उपाययोजनांची माहिती सर्व महिला अधिकाऱ्यांना हवी. त्यांची स्वतःची नोकरी व कुटुंब सांभाळतांना आपल्या पदाच्या माध्यमातून संपर्कात येणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घ्यावा.
प्रास्ताविक श्रीमती रेश्मा चिमंद्रे यांनी केले. सुत्रसंचालन श्रीमती प्रविणा कन्नडकर यांनी केले. दिवसभर चालणाऱ्या कार्यशाळेत डॉ. समिना पठाण यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी, ॲड. शुभांगी वक्ते यांचे महिलांविषयक कायद्यांची अंमलबजावणी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य व ताणतणाव व्यवस्थापन, श्रीमती गीता बागवडे यांचे महिला सुरक्षितता- समस्या व उपाययोजना , श्रीमती रेश्मा चिमंद्रे यांचे महिलांसाठीच्या विविध योजना व अंमलबजावणी याविषयावर विविध सत्रात मार्गदर्शन होणार आहे.
What's Your Reaction?






