रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ.कल्याण काळे यांचे नितिन गडकरी यांना निवेदन

जालना-छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्याच्या आठ पदरी विस्तारासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन.
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज) जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.कल्याण वैजिनाथराव काळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जालना-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)-अहिल्यानगर (अहमदनगर) या महत्त्वाच्या महामार्गाच्या आठ पदरी विस्तारीकरणासाठी व सदर रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात समावेश करण्यासाठी निवेदन दिले.
या पत्रात खासदार काळे यांनी या मार्गाचे व्यापारी आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्व अधोरेखित करत, सद्यस्थितीत या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने रस्ता अपघातांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आणून दिले. या आठ-लेन महामार्गाच्या विकासामुळे वाहतूक सुरळीत होईल, अपघातांची संख्या कमी होईल, तसेच व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
या आठ-लेन महामार्गामुळे होणारे महत्त्वाचे फायदे –
वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल.
रस्ते सुरक्षेत वाढ होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल.
प्रवासी आणि वाहतूक सेवांची गती वाढेल.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संपर्क सुधारेल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
What's Your Reaction?






