नोटीस दिल्यानंतरच पाडापाडी करा, पोलिस आयुक्तालयातील बैठकीत निर्णय...

नोटीस दिल्यानंतरच पाडापाडी करा,
पोलीस आयुक्तालयातील बैठकीत महत्वाचा निर्णय, हर्सूलच्या मालमत्ताधारकांना 7 दिवसांचा दिलासा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) -
3 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर महापालिकेने 4 व 5 ऑगस्टला नारेगावात अतिक्रमण काढले, 6 ऑगस्टपासून हर्सूल येथे कारवाई होणार होती, मात्र कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनही कारवाई करण्याची भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेचा अनुभव नारेगावात कारवाईदरम्यान नागरिक व महापालिकेला आला. आता हर्सूलमधील बाधित मालमत्ताधारकांना 7 दिवसांची नोटिस बजावल्यानंतरच कारवाई करण्याचा निर्णय बुधवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे हर्सूलच्या मालमत्ताधारकांना 7 दिवसांचा दिलासा मिळाला आहे.
हर्सूल टी पॉइंट ते मनपा हद्दीतील समृद्धी लॉन्सपर्यंतचा रस्ता 60 मीटर करण्यासाठी महापालिकेच्या वतीने बाधित अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे पाडण्याची कारवाई 6 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार होती. मात्र नोटिस न देता, पंचनामा न करताच तसेच मोबदला न देताच पाडापाडी करण्यास हर्सूलच्या रहीवाशांचा विरोध केला आहे. यासंदर्भात सातत्याने नागरिकांच्या बैठका होत आहेत. कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून भूसंपादन प्रक्रिया पार पाडून जागा घ्याव्यात, धार्मिकस्थळे व महापुरुषांच्या पुतळ्यासाठी पर्यायी जागा द्यावी, अशी मागणी हर्सूलवासियांनी केली आहे. तसेच नागरिकांनी काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेवून परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस आयुक्तालयात बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, अतिक्रमण विभागप्रमुख संतोष वाहुळे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीनंतर मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार 7 दिवसाची मुदत दिल्यानंतर हर्सूल भागात कारवाई केली जाईल. या भागातील सुमारे 300 मालमत्ता रस्त्यात बाधित होत असून यातील अनेकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले आहे. उर्वरित 27 मालमत्ता धारकांना आता नोटीस बजावून बाधित बांधकाम काढून घेण्यास त्यांना 7 दिवसांचा वेळ देण्यात येईल. तसेच अतिक्रमणाच्या वेळी महापालिकेने नियुक्त केलेले माजी सैनिक आता पोलिसांच्या नियंत्रणाखाली काम करतील. मार्किंग व टोटल स्टेशन सर्वे करताना, विरोध होत आहे. त्यामुळे यापुढे मार्किंगसाठी पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले आहे.
चंपा चौक ते जालना रोड यासह विकास आराखड्यातील ईतर रस्त्यावरील बाधित मालमत्ताधारकांना नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. 15 ऑगस्टनंतर सणावाराचे दिवस सुरू होत आहे, त्यामुळे पोलीस बंदोबस्त देता येणार नाही, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहिम बारगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हर्सूल येथील 15 नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत, कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या याचिकांच्या सुनावणीप्रकरणी कडक शब्दांत आदेश दिले आहेत. बांधकामाला परवानगी असली तरी मालमत्ताधारकांच्या ॲक्युपन्सी सर्टिफिकेट (ओसी) ची तपासणी करा, असे आदेश दिलेले आहेत. ओसीची तपासणी करत असताना, पार्किंगची जागा सोडलेली आहे का...? हे पण बघावे लागेल. नसेल तर ते पण तोडा, असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. आम्ही शंभर टक्के प्रक्रियेचा अवलंब केला, तर खूपच कडक कारवाई करावी लागेल. आम्ही सर्वांना विश्वासात घेवून किमान समोर पार्किंगची जागा तरी मोकळी ठेवा, असा आग्रह आम्ही धरत आहे., असेही मनपा आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले.
What's Your Reaction?






