शहरातील आणखी 5 धोकादायक इमारतींवर फिरला महापालिकेचा बुलडोझर, 2 दिवसांत 10 इमारती जमीनदोस्त
शहरातील आणखी 5 धोकादायक इमारती जमीनदोस्त; दोन दिवसांत 10 इमारतींवर मनपाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6 (डि-24 न्यूज) – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या जीवितास धोका ठरू शकणाऱ्या जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतींविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक मोहीम सुरू ठेवली आहे. गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी शहरातील आणखी 5 धोकादायक इमारती पाडण्यात आल्या. या कारवाईमुळे दोन दिवसांत एकूण 10 धोकादायक इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेने शहरातील 42 इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्या असून संबंधित मालकांना वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, अनेकांनी त्यानुसार कारवाई न केल्याने महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेत बुलडोझरच्या सहाय्याने या इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी सिटी चौक परिसरातील अत्तर गल्लीतील दोन, झोन क्रमांक २ मधील दोन आणि झोन क्रमांक ३ मधील एका धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यात आली होती.
गुरुवारी गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिर परिसरातील बाबूलाल कन्नूलाल व गिरधारीलाल तनवाणी यांच्या मालकीच्या दोन जीर्ण इमारती जेसीबीच्या सहाय्याने अवघ्या काही मिनिटांत पाडण्यात आल्या. धोकादायक स्थितीमुळे या इमारती रिकाम्या करण्यात आल्या होत्या. कारवाईदरम्यान परिसरात आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली.
या मोहिमेत झोन क्रमांक 1 च्या सहायक आयुक्त लता पुजारी, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच नागरी मित्र पथकाने सहभाग घेतला.
संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले की, शहरातील उर्वरित धोकादायक इमारतींवरही टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू राहणार असून शुक्रवारी सिटी चौक परिसरातील इमारतींवर पुढील मोहीम राबविण्यात येणा
र आहे.
What's Your Reaction?