हायकोर्ट क्लार्क पदाच्या परीक्षेत तांत्रिक बिघाड, विद्यार्थी रस्त्यावर

 0
हायकोर्ट क्लार्क पदाच्या परीक्षेत तांत्रिक बिघाड, विद्यार्थी रस्त्यावर

हायकोर्ट क्लार्क टायपिंग परीक्षेत तांत्रिक बिघाड; परीक्षार्थी रस्त्यावर

पुनर्परीक्षेची मागणी; सुराणा नगरात विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांनी हाताळली परिस्थिती, विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजित दिपके पोहोचले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करत चौकशीची मागणी केली आहे... विद्यार्थी नाही तर सरकार फेल झाले अशी टिका त्यांनी केली आहे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. 16 (डि-24 न्यूज) :- महाराष्ट्र राज्यात बाॅम्बे हायकोर्टात क्लार्क पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. क्लार्क पदासाठी घेण्यात येणाऱ्या टायपिंग परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाड झाल्याने परीक्षार्थींमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. सुराणा नगर येथील ‘बायट्स इन्फोटेक’ परीक्षा केंद्रावर रविवारी (दि. 16) पहिल्या बॅचची परीक्षा सुरू असताना संगणक आणि परीक्षा सॉफ्टवेअरमध्ये वारंवार अडचणी निर्माण झाल्याची तक्रार परीक्षार्थींनी केली.

परीक्षार्थींच्या म्हणण्यानुसार, अनेक संगणकांना जोडलेले कीबोर्ड व्यवस्थित कार्यरत नव्हते. काही वेळा की दाबल्यानंतर स्क्रीनवर अक्षरे उमटत नसल्याने टायपिंगचा वेग प्रभावित झाला. टायपिंग परीक्षेत वेळ आणि अचूक वेगाला मोठे महत्त्व असल्याने या तांत्रिक त्रुटींचा परीक्षेच्या कामगिरीवर थेट परिणाम झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

दरम्यान, परीक्षा सुरू असतानाच काही संगणकांवरील परीक्षा प्रणाली अचानक बंद पडल्याचीही तक्रार करण्यात आली. काही परीक्षार्थी आपोआप लॉग-आउट झाल्याने त्यांनी टाइप केलेला मजकूरही स्क्रीनवरून गायब झाल्याचे सांगितले. त्यामुळे परीक्षेचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.

तांत्रिक अडचणींमुळे संतप्त झालेल्या परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राबाहेर येत आंदोलन सुरू केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तांत्रिक बिघाडाची चौकशी करावी तसेच प्रभावित झालेल्या सर्व उमेदवारांची पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी केली आहे.

तांत्रिक त्रुटी दूर करून निष्पक्षपणे पुनर्परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली असून, ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता या प्रकरणी संबंधित परीक्षा यंत्रणा आणि उच्च न्यायालय प्रशासन काय निर्णय घेते, याकडे परीक्षार्थी व त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow