122 LED टिव्हीवर चोरांचा डल्ला, वाहनासह 44 लाखांचा मुद्देमाल जप्त...!
122 LED टीव्हीवर चोरांचा डल्ला, वाहनासह 44 लाखांचा मुद्देमाल जप्त...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.8 (डि-24 न्यूज) – सिंधी कॉलनी परिसरातील गोदामातून तब्बल 150 एलईडी टीव्ही व काही टीव्हीचे सुटे भाग चोरी करणाऱ्या नोकरांच्या टोळीला जवाहरनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 122 एलईडी टीव्ही, टीव्हीचे सुटे भाग तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 44 लाख 44 हजार 977 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविंद्रसिंह जसवंतसिंह जोहर (वय 48, व्यवसाय व्यापार, रा. प्लॉट नं. 4, गुरुद्वारा समोर, सिंधी कॉलनी) यांच्या सिंधी कॉलनीतील गोदामातून तसेच निशा प्राइड इमारत, मोठा नाका परिसरातून आयआर कंपनीच्या वेगवेगळ्या आकाराच्या टीव्हींची चोरी करण्यात आली होती. सन 2024 पासून 25 ऑगस्ट 2026 पर्यंत सुमारे 150 एलईडी टीव्ही व काही टीव्हीचे सुटे भाग चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. चोरी झालेल्या मालाची किंमत अंदाजे 34 लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत 26 ऑगस्ट 2026 रोजी तिघांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मनीष दिलीप नरवडे (वय 26, रा. देवनगरी कॉलनी, मुकुंदवाडी), अकबर शेख मोहम्मद अली शेख (वय 55, रा. बाबर कॉलनी, हत्तीसिंगपुरा) आणि राजेंद्रकुमार फुलचंद परदेशी (वय 53, रा. शेजनवाल गल्ली, गुलमोहर कॉलनी, पडपाव) यांचा समावेश आहे.
पोलिस चौकशीत आरोपींनी गोदामात काम करत असताना सन 2024 पासून एक-दोन टीव्ही अशा पद्धतीने काढून चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना व नाशिक परिसरात ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून हे टीव्ही कमी किमतीत विकल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
आरोपींकडून 122 एलईडी टीव्ही व सुटे भाग, तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 44 लाख 44 हजार 977 रुपये आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त परिमंडळ-2 रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर व सहाय्यक पोलिस आयुक्त सय्यद मजहर गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली. तपास पथकात पोलिस निरीक्षक सचिन कुमार, पोउपनि. राधा लाटे, पोउपनि. रविकुमार गाडेकर यांच्यासह पोलिस अंमलदारांचा सहभाग होता.
What's Your Reaction?