13 ते 18 ऑगस्ट दरम्यान दौलताबाद-वेरुळ मार्गावर जड वाहनांना बंदी...

 0
13 ते 18 ऑगस्ट दरम्यान दौलताबाद-वेरुळ मार्गावर जड वाहनांना बंदी...

श्रावणमास व जर-जरी उरुसानिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल

13 ते 18 ऑगस्टदरम्यान जड वाहनांना दौलताबाद-वेरूळ मार्गावर बंदी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.12 (डि-24 न्यूज) - श्रावणमास तसेच खुलताबाद येथील जर-जरी बख्श उरुसानिमित्त भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 18 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत संबंधित मार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

श्रावण महिन्यात दर शनिवारी खुलताबाद येथील श्री भद्रामारोती देवस्थान तसेच सोमवारी वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. भाविक पायी, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमधून येत असल्याने या कालावधीत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते.

याच काळात खुलताबाद येथील जर-जरी बक्ष उत्सवही सुरू असून तो सुमारे महिनाभर चालणार आहे. त्यामुळे खुलताबाद-वेरूळ परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

खुलताबाद व वेरूळ ही पर्यटन व धार्मिक स्थळे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 लगत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू असते. खुलताबाद ते फुलंब्री मार्गावरही वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक कोंडी होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जड वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग

 कन्नड, वेरूळ, खुलताबाद, दौलताबादकडून छत्रपती संभाजीनगरकडे येणारी वाहने :

छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – कसाबखेडा फाटा मार्गे कन्नडच्या दिशेने वाहतूक वळविण्यात येणार आहे.

फुलंब्री – खुलताबाद – वेरूळ – कन्नडकडे जाणारी वाहने :

फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर – शरणापूर फाटा – माळीवाडा – कसाबखेडा फाटा मार्गे कन्नडच्या दिशेने वाहने जातील.

वैजापूर – शिवूर – पाचपीरवाडी – वेरूळ – खुलताबाद – फुलंब्रीकडे जाणारी वाहने :

वैजापूर – शिवूर – पाचपीरवाडी – शरणापूर – छत्रपती संभाजीनगर मार्गे फुलंब्रीच्या दिशेने वाहतूक वळविण्यात येणार आहे.

13 ऑगस्टपासून जड वाहतुकीला बंदी

दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 18 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजेपर्यंत दौलताबाद टी पॉइंटपासून वेरूळपर्यंत तसेच फुलंब्री ते खुलताबादपर्यंत वरील मार्गाने जाणारी सर्व जड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित मार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

— प्रकाश भा. जाधव, पोलीस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow