अनेकांना पत्रकारीता क्षेत्रात घडवणारे प्रा.सुरेश पुरी यांचे 76 व्या वर्षात पदार्पन, संपादक अमर हबीब यांना लोकपत्रकारीता पुरस्कार

झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु या सम हा…
‘जनसंपर्क’ कृतीतून शिकवणारे ‘प्राध्यापक’. समाजाचे ‘डॉक्टर’. अडल्या नडलेल्यांचे ‘कैवारी’. अत्यंत काबाड कष्टातून, बालवयापासून स्वत: शिक्षण घेऊन समाज ऋण फेडणारे ‘सुधारक’. राष्ट्रभाषेची सेवा करणारा सच्चे ‘पाईक’. आपल्या असामान्य कृतीतून त्यांनी जीवनात उभी केलेली असंख्य माणसं. ही त्यांची ‘ख्याती’. हे सगळं सांगण्याचं कारण आज (१९ मे २०२५) त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस. ७६ व्या वर्षात प्रवेश करूनही तरूणांना लाजवेल, असा नवमाध्यमांचा कुशलतेने वापर करणारे जनसंपर्क तज्ज्ञ प्राध्यापक सुरेश पुरी सर. वाढदिवसानिमित्त त्यांना अनंत शुभेच्छा. या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ पत्रकार, संपादक अमीर हबीब या सुयोग्य व्यक्तीला ‘जनसंपर्क तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी लोकपत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
सरांना म्हणतात (काही जण) , तुम्ही ‘त्या’ काळातले उच्च शिक्षित. शिवाय विद्यापीठात (डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजी नगर) प्राध्यापक. काय कमावलं (आर्थिक बाबीनं) ?, ते या प्रश्नावर हसतात. नजरेत नजर भिडवतात. पुन्हा हसतात. आजूबाजूच्या इतरांकडे पाहतात. त्यांचं हे उत्तर ऐकण्यासाठी इतरही आतूर असतात, ते सांगतात … ‘मी पैसा नाही कमावला. मला तो कमवता आला असता. अनेक संधी होत्या. पण बालवयापासूनच मला पैशाचा कधी मोह नव्हता. अन् आजही नाही. पण मी मात्र, जरूर एक सांगेन, मी कमवू शकलोय, ती महाराष्ट्रासह देश-विदेशात असलेली माझी माणसं. माझे विद्यार्थी. मी माझ्या विद्यार्थ्यांना माझं काळीज मानतो. त्यांच्याबद्दल मी सांगण्यापेक्षा तेच तुम्हाला माझ्याबद्दल अधिक सांगतील. ज्यांच्या घरात शिक्षणाचा गंध नव्हता, त्यांना उच्च शिक्षण देऊ शकलो. अथवा मला तसा हातभार लावण्याचं भाग्य मिळालं. त्यांच्यावर मी उपकार केलेत, असे माझे मुळीच मत नाही. पण गाव तांड्यापासून, वाड्या वस्तीवर शिक्षणाची दरवाजे खुली करता आली. शिक्षणाचा विचार पेरता आला. विस्तार करता आला. माझा सुरूवातीपासूनच तसा प्रामाणिक प्रयत्न होता. तो मी केला. या प्रयत्नांचे फळ आज महाराष्ट्रासह देश-विदेशात उच्च पदावर असलेले माझे विद्यार्थी. तर कुणी त्यांच्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिकप्राप्त नामवंत आहेत. हीच माझी खरी संपत्तीय. हेच मी कमावलेले माझ्या जीवनाचे धन आहे.’
अशी गुरू माणसं भेटणं, त्यासाठी भाग्यच लागतं. तसे अनेकजण लाभार्थी, त्यापैकीच मी एक (शेंडेफळ). कुणी त्यांना बाबा, तर कुणी पालक म्हणतं. शिक्षक, प्राध्यापकांना असं संबोधनं, क्वचितच आढळतं. नुसतंच संबोधलं जातं, असं नाही. तर ते नातं जपल्याही जातं, हे विशेष.
सरांना सेवानिवृत्त होऊन पंधरा वर्षे झाली. तरीदेखील आज ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपर्कात आहेत. त्यांच्या सुखा दु:खात सहभागी होतात. शिवाय हैद्राबाद येथील हिंदी प्रचार सभेचं कामही ते नेटानं करतात. त्यातही शिस्तबद्धता आहेच. वर्ध्याच्या आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठानं त्यांना ‘हिंदी सेवी सन्मान’ पुरस्कारानं गौरवलं. तरीदेखील त्यांची हिंदी भाषेप्रतीची असलेली निष्ठा, समर्पण भाव या पुरस्कारापेक्षाही खूपच अधिक आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने त्या पुरस्काराचे महत्त्व वाढले, असेच म्हणावे लागेल.
सरांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकालाच मदत केली. त्याबाबतचा माझा अनेक बाबींमधील एक किस्सा असा… आम्ही विद्यापीठातील वस्तीगृहात राहत. आमचा पत्ता-केअर ऑफ ॲड्रेस पुरी सरांचे घर. पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदवीचं शेवटचं सेमिस्टर आमचं संपलं. आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न, विद्यापीठातलं आपलं शिक्षण पूर्ण झालं. आता रहायचे कुठे ? छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे औरंगाबाद) मध्ये आम्ही पत्रकारिता करत होतो. तरीही बाहेर रूम करून राहणे, आम्हाला परवडणारे नव्हते. कारण पगार जेमतेमच. तो कधी मिळेल, याची शाश्वती नसायची. मग अशी परिस्थिती असताना, सांगणार कुणाला… तर एकच सोल्यूशन… पुरी सर. सरांना सांगितलं. सरांनी ऐकून घेतलं. त्यावर सरांची प्रतिक्रिया काहीच नाही. आम्ही तर सरांना बोललो. पण रिप्लाय न आल्याने मनात धाकधूकच. काय होईल, कसं होईल, काहीच कळत नव्हतं. जसंही सेमिस्टर संपलं, अन् आता आम्हाला रेक्टर वस्तीगृहात ठेवणारच नाही, अशी परिस्थिती आली. तेव्हा पुन्हा एकदा सरांच्या कानावर आमची राहण्याची बाब घातली. सरांनी पुन्हा ऐकलं. अन् सांगितलं… ‘जवाहर कॉलनीत जा. तिथं माझं एक घर आहे. त्या घराचे मालक तुम्ही आहात, असच रहा.’ आम्हाला विश्वासच बसेना. सरांचे घर ? सरांनी दिलेल्या पत्त्यावर आम्ही राहण्यासाठी निघालो. पत्ता होता… हेडगेवार रूग्णालयासमोरील जवाहर कॉलनी. आम्ही जाण्यापूर्वी मित्रवर्य पत्रकार संदीप काळे (सध्या संस्थापक, व्हाईस ऑफ मिडिया) सहकुटुंब तिथे राहत होते. त्यांनी छत्रपती संभाजी नगर सोडल्याने त्या दोन खोल्या रिकाम्याच होत्या. त्यापैकी एका खोलीत लोकपत्रचे तत्कालिन उपसंपादक सुधाकर जाधव (सध्या उपसंपादक/वार्ताहर, लोकमत, बुलडाणा) राहत.
माझ्या सोबत पत्रकार मित्र नारायण भारती (सध्या वरिष्ठ उपसंपादक, सकाळ, छत्रपती संभाजी नगर) आम्ही दोघेजण सरांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. आता आम्हाला आकाश ठेंगणे वाटू लागले. कारण इथून आमच्या दोघांचे (नारायण आणि मी) महेश नगर येथे असलेले ‘मराठवाडा साथी’ चे कार्यालय जवळच होते. त्यामुळे जाण्या येण्याचा खर्चही आमचा वाचणार होता. आमची राहण्याची मोफत सोय झाली होती. तो आनंद गगनात न मावणारा होता. आमच्या सारखीच परिस्थिती वस्तीगृहातील इतरांची होणार होती. आमची तर सोय झाली. तशीच इतरांच्या गरजेप्रमाणेही हळूहळू या खोल्यांमधील विद्यार्थी संख्या वाढत गेली.
यामध्ये ‘एमजीएम’चे विद्यार्थी राहुल पाटील (सध्या उपसंपादक, सकाळ, कोल्हापूर), सागर चव्हाण (संचालक, इन्फो मिडिया, मुंबई), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नामदेव खेडकर (सध्या संपादकीय प्रमुख, डीबी स्टार), गणेश खेडकर (वरिष्ठ वार्ताहर, पुण्यनगरी), यासह आयबीएन लोकमतचे पत्रकार माधव सावरगावे (सध्या ब्युरो चीफ, साम टीव्ही, छत्रपती संभाजी नगर) असे आम्ही या ठिकाणी अगदी गुण्या गोविंद्याने राहू लागलो. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काम करणारे, विद्यार्थी इथं एकत्र राहत. खोलीला कुलुप एकच. खोलीतून शेवटी बाहेर पडणाऱ्याने कुलुप लावायचे. त्याची चावी तिथेच बाजूच्या खिडकीवर ठेवायची, अशी आमची आचारसंहिता.
जालना रोडवरील प्रेसिडेंट पार्क (सध्याचे लेमन ट्री) नामांकित हॉटेल होते. त्याला ‘पीपी’ म्हणत. मग आम्हीही आमच्या राहण्याच्या ‘त्या’ खोल्यांना या हॉटेलच्या नावावरून ‘पीपी (पुरी पॅलेस)’ नामकरण केले. या ठिकाणी राहणाऱ्यांना कोणतंही भाडं द्यावं लागलं नाही, की वीज देयक, पाणी वा घरपट्टी. सर्व कर, आम्ही वापरलेले विजेचे देयके देखील पुरी सरच भरत. कुणाकडूनही त्यांनी दमडीची अपेक्षा केली नाही.
या ‘पीपी’चा अर्थच असा, की ते आमच्यासाठी पॅलेसच. अन् तेही पुरी सरांचे. म्हणून आमचा राहण्याचा नवीन पत्ता ‘पीपी’, अर्थात ‘पुरी पॅलेस’ झाला. ज्या शहरात आमची राहण्याची व्यवस्था नव्हती, तिथे आम्ही ‘पॅलेस’ मध्ये राहू लागलो. हा आमच्यासाठी आनंददायी क्षणच होता.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मिडिया स्कूलचे विद्यमान प्रोफेसर डॉ. सुहास पाठक (श्री व सौ) देखील या जागेत राहिलेले आहेत. छत्रपती संभाजी नगरात (तत्कालिन औरंगाबाद) पाठक सर एका खासगी कंपनीत काम करत. तत्कालिन परिस्थितीनुसार त्यांनीही या ‘पीपी’चा लाभ घेतलेला आहे. १९८० ते २००८-०९ पर्यंत गरजू विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी पत्रकारांचे मोफत असे खासगी विद्यार्थी वस्तीगृह सरांनी या ठिकाणी निर्माण करत त्यांना सुविधा दिली. लेखात नामोल्लेख केलेले नावे वागनीदाखल दिलेले आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थी, पत्रकारांसाठी ही राहण्याची जागा म्हणजे मोफत वस्तीगृहच.
सन १९८० मध्ये महाराष्ट्र हिंदी विद्यावर्धक समितीमार्फत सुरू झालेल्या मराठवाड्यातील पहिल्या सामाजिक कार्य महाविद्यालयाची जागा म्हणजेच ‘पीपी’. या समितीचे अध्यक्ष धानुका तर सेक्रेटरी डॉ. चंद्रदेव कवडे होते. प्रा. मोतीराज राठोड, प्रा. बापूराव जगताप व पुरी सरांच्या खोल्यांमध्ये ज्या कॉलेजची सुरूवात झाली, ती ही जागा. याठिकाणी आम्हाला राहता आले, ते आमचे सर्वांचे भाग्यच. पुढे हे महाविद्यालय काही कारणांनी विद्यापीठात सुरू झाले.
दूरदृष्टीने मराठवाड्यात सामाजिक कार्य महाविद्यालय सुरू केले, ते पुरी सर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात समाज कार्य विषय घेऊन अनेकांनी शिक्षण पूर्ण केले. शासनाच्या खात्यात ते उच्च पदावर पोहोचले. अशा पिढीने सरांच्या कार्याचा गौरव म्हणून विद्यापीठात ‘कृतज्ञ सोहळा’ साजरा केला. या कार्यातून सरांचे दूरदृष्टीपण आणि कार्य किती महान आहे, ते कळते. सरांनी केवळ पत्रकारिता, जनसंपर्क या क्षेत्रातच माणसं उभी केली असे नाही. तर त्यांनी हिंदी, समाज कार्य या विषयात देखील मोलाचे योगदान दिले. शिवाय भटक्या विमुक्त जाती, बंजारा, कैकाडी समाजासह सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आत्मियतेने प्रयत्न केलेत, याची इतिहासाला दखल घ्यावीच लागेल.
लोक आपला आदर्श सेलिब्रिटी, नामवंत व्यक्तीमध्ये शोधतात. परंतु माझा आदर्श कायमस्वरूपी पुरी सर तुम्ही आहात. ‘झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु या सम हा’ ही म्हण तुमच्यासाठीच आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आपणास खूप शुभेच्छा.
- डॉ. श्याम टरके, सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहि
ती कार्यालय, लातूर
What's Your Reaction?






