26 सप्टेंबर पर्यंत औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी नव मतदारांना करता येणार अर्ज
पदवीधरच्या पुरवणी यादीसाठी 26 सप्टेंबरपर्यंतच करता येणार अर्ज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24(डि-24 न्यूज)- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या मतदार संघाच्या पुरवणी यादीसाठी नाव समाविष्ट करण्यासाठी 26 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे नाव समाविष्ट करण्यासाठी इच्छूक मतदारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 22 सप्टेंबर 2026 रोजी जाहीर केला आहे. त्यानुसार 29 सप्टेंबर 2026 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध होताच त्याच दिवसापासून नामांकन भरण्यास सुरुवात होणार आहे. 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत नामांकन दाखल करता येणार आहेत. तर 7 ऑक्टोबर रोजी दाखल नामांकनाची छाननी होणार आहे. 9 ऑक्टोबरपर्यंत नामांकन परत घेता येणार आहेत. 23 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. 12 जानेवारी 2026 रोजी पदवीधर मतदारसंघाची अंतीम मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. या यादीमध्ये 2 लाख 88 हजार 783 मतदार होते. 22 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दाखल केलेल्या 11 हजार 341 मतदारांपैकी 9 हजार 938 मतदार यादीत समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 2 लाख 98 हजार 721 मतदार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे, असे प्रशासनाने सांगितले. परंतु यामुळे मतदारांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. अर्ज केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करून नाव समाविष्ट करून त्याची पुरवणी मतदार यादी तयार करण्यासाठी किमान 10 दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे मतदारांना केवळ 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. 25 सप्टेंबर रोजी शुक्रवार असल्याने शासकीय कार्यालये सुरू राहणार आहेत. त्यामुळे इच्छूक मतदारांना जवळच्या तहसील कार्यालयात अर्ज दाखल करता येणार आहे. परंतु 26 सप्टेंबर रोजी शनिवार असल्याने शासकीय कार्यालयांना सुटी आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. त्यावेळी इच्छूक मतदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे. 26 नंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने दाखल होणाऱ्या अर्जांवर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करू नये, असे पत्रच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रशासनाला पाठविले आहे.
पुरवणी मतदार यादीसाठी दोनच दिवसांचा वेळ शिल्लक राहिल्याने इच्छुकांनी तात्काळ नोंदणी करावी, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी केले आहे.
What's Your Reaction?