कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्री, कपास किसान व ई-समृध्दी अॅपवर नोंदणीची सुविधा...
कापूस, सोयाबीन, मका हमी भावाने विक्रीः
‘कपास किसान’ व ‘ई- समृद्धी’ॲपवर नोंदणीची सुविधा...
छत्रपती संभाजीनगर, दि.1 (डि-24 न्यूज)- हंगाम सन 2025-26 मध्ये हमीभावाने कापूस व सोयाबीन, मका विक्री करण्यासाठी भारतीय कापूस निगम लिमिटेड यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी कापूस किसान मोबाइल अॅप्लिकेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर सोयाबीन विक्रीसाठी ई समृद्धी ॲपवर तर मका करीता स्वतंत्र लिंकवर नोंदणीची सुविधा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी ॲप सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
यासंदर्भात आज प्रधान सचिव सहकार व पणन यांनी दुरदृष्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. शेतकऱ्यांना आपला कापूस, सोयाबीन ही पिके हमी भावाने विकता यावी यासाठी ही सुविधा शासनाने उपलब्ध करुन दिली आहे.
त्यासाठी कापूस विक्रीसाठी कपास किसान ॲप तर सोयाबीन विक्रीसाठी ई समृद्धी या मोबाईल ॲपवर नोंदणी करता येणार आहे.
कपास किसान अॅपद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनींची नोंदी आणि कापूस लागवड क्षेत्रात तपशीलाची पडताळणी करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याकरिता व राज्यातील कापसाची आधारभूत किंमतीने खरेदीची कार्यवाही प्रभावी व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक उपयोजना करण्यासाठी कापूस उत्पादक क्षेत्रात तालुकास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत.
कापूस खरेदीसाठी 8 केंद्र...
महाप्रबंधक, भारतीय कापूस निगम लिमिटेड छत्रपती संभाजीनगर यांनी किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत सन 2025-26 या हंगामामध्ये भारतीय कापूस निगम लिमिटेड यांच्या मार्फत कापूस खरेदीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक निगराणी समिती (Local Monitoring Committee) स्थापन केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 6 तालुक्यात (पाचोड व बालानगर,ता.पैठण, सिल्लोड, सोयगाव, शिऊर बाजार, ता. वैजापुर, खामगाव ता. फुलंब्री, गंगापुर व लासूर ता. गंगापुर) 8 कापूस खरेदी केंद्रे आहेत.
सोयाबीन खरेदीसाठी 11 केंद्र...
तसेच छत्रपती संभाजीनगर, गंगापुर, वैजापुर, खुलदाबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री व संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था असे एकूण 9 ठिकाणी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे सोयाबीन खरेदी केंद्र आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किमान आधारभूत दरानुसार नोंदणी / NCCF मार्फत हंगाम 2025-26 करीता सोसायटी विक्रेत्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समिती सिल्लोड व आकाश ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनी असे एकूण दोन ठिकाणी सोयाबीन नोंदणी सुरु आहे.
मका खरेदीसाठी 11 केंद्र
तसेच छत्रपती संभाजीनगर, गंगापुर, लासूर स्टेशन, वैजापुर, खुलदाबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री व संत ज्ञानेश्वर कृषी सेवा सहकारी संस्था, पाचोड व वीर महिला क्रांती शेतकरी कंपनी शिवना असे एकूण 11 ठिकाणी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे मका खरेदी केंद्र आहेत. या ठिकाणी मका नोंदणी सुरु आहे. त्यासाठी शासनाने स्वतंत्र लिंक दिली आहे. https://mspbeam.in/accounts/signin या लिंकवर जाऊन शेतकऱ्यांनी आपल्या मका पिकाची नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
पूर्वनोंदणी करण्याचे आवाहन...
त्यानुसार हमीदराने कापूस विक्री करण्यासाठी भारतीय कपास निगम लिमिटेड यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पूर्व नोंदणी करण्यासाठी कपास किसान मोबाइल अॅप्लिकेशन तसेच सोसायटी नोंदणीसाठी ई-समृद्धी अॅपवर तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या नोंदणीकृत खरेदी केंद्राशी संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
What's Your Reaction?