अल्पसंख्यांक युवकांसाठी पोलीस भरती प्रशिक्षणाची मागणी...

अल्पसंख्याक युवक-युवतींसाठी पोलीस भरती प्रशिक्षणाची मागणी : मार्टि कृती समितीकडून निवेदन, आयुक्तांनी दिले आश्वासन
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) -
महाराष्ट्र शासन गृह विभागाने दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी एकूण 15,631 पदांसाठी पोलीस व कारागृह शिपाई मेगा भरती जाहीर केली. या ऐतिहासिक संधीमध्ये अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींचा सहभाग वाढावा व त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मार्टि कृती समिती, महाराष्ट्र राज्य तर्फे आयुक्त, अल्पसंख्याक आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे
समाजातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेत मागे राहतात. त्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य व अभ्यास संसाधने मिळत नसल्यामुळे संधी गमवावी लागते. या परिस्थितीत अल्पसंख्याक समाजातील तरुणाईला पोलीस व कारागृह सेवेत मोठ्या प्रमाणात प्रवेश मिळावा, यासाठी समितीने शासनाला पुढील उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
समितीच्या प्रमुख मागण्या
व्यापक जनजागृती अभियान : मराठी, उर्दू व हिंदी भाषेत माहिती प्रसार; शाळा-महाविद्यालयांमध्ये शिबिरे; समाजमाध्यमे व स्थानिक वृत्तपत्रांतून प्रचार.
मोफत निवासी प्रशिक्षण केंद्रे : प्रत्येक जिल्ह्यात किमान एक केंद्र; महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा.
गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण रचना : लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखतीसाठी मार्गदर्शन; ऑनलाइन मॉक टेस्ट, व्हिडिओ लेक्चर्स, मोफत अभ्यास साहित्य; चार महिन्यांचा निवासी प्रशिक्षण कार्यक्रम भोजन, निवास व तज्ज्ञ मार्गदर्शनासह.
सवलती व प्रोत्साहन योजना : प्रशिक्षणार्थींना प्रवास भत्ता, मोफत साहित्य व शिष्यवृत्ती; वयोमर्यादा शिथिलतेबाबत माहिती.
संस्थात्मक समन्वय : स्थानिक पोलीस प्रशिक्षण केंद्रे, अल्पसंख्याक आयोग व जिल्हास्तरीय संस्था यांच्या सहकार्याने शिबिरे.
आयुक्तांची प्रतिक्रिया
निवेदन स्वीकारताना आयुक्त, अल्पसंख्याक आयुक्तालय यांनी समितीच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक पावले उचलली जातील, असे सांगितले.
त्यांनी स्पष्ट केले की –
“बार्टी व सारथी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक युवक-युवतींसाठी प्रशिक्षण सुविधा निर्माण व्हाव्यात, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल.”
अपेक्षित परिणाम
अल्पसंख्याक समाजातील युवक-युवतींचा पोलीस व कारागृह सेवेत मोठ्या प्रमाणावर सहभाग.
सामाजिक समावेशकतेला चालना व समान संधी.
प्रशासनातील विविधतेमुळे समाजातील विश्वास दृढ.
निवेदन सादर करताना सादरीकरणावेळी मार्टि कृती समितीचे अध्यक्ष अॅड. अझर पठाण, सरचिटणीस अॅड. शेख वसीम, अॅड. जाहेद सईद, अॅड. हकीम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच हे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री, अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री व सचिव तसेच महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष यांनाही ई-मेल व प्रत्यक्ष भेटीद्वारे सादर करण्यात आले.
What's Your Reaction?






