आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा एक हात मदतीचा...

 0
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा एक हात मदतीचा...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाचा ‘एक हात मदतीचा’

खचून जाऊ नका, प्रशासन, समाज तुमच्या सोबत-जिल्हाधिकारी स्वामी...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.16(डि-24 न्यूज)- जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आज दिवाळी सणाच्या पार्श्वभुमिवर जिल्हा प्रशासनाने ‘एक हात मदतीचा’ दिला. दिवाळ सणासाठी लागणाऱ्या वाण सामानाचे किट देण्यात आले. शेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी प्रसंगाला आपण सामोरे जात असतांना खचून जाऊ नका, प्रशासन, समाज तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थित शेतकरी कुटुंबियांना दिला.

 जिल्हाधिकारी कार्यातील नियोजन सभागृहामध्ये आज ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत पैठण फुलंब्री आणि छत्रपती संभाजी नगर या तीन तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. फराळ किट आणि किराणा साहित्य, रब्बी हंगामासाठी बियाणे किट वाटप करण्यात आले. जिल्हा प्रशासनासोबत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग संस्थान, वेरूळ यांच्या सहकार्याने साहित्याचे वाटप करण्यात आले. 

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे मनसुख झांबड, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, पैठण तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्री तहसीलदार योगिता खटावकर, तसेच पैठण, फुलंब्री आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी कुटुंबीय या कार्यक्रमास उपस्थित होते.    

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, संकटात खचून न जाता त्यांच्या दुःखात जिल्हा प्रशासन आणि इतर नागरिक, संस्था मदतीला आहेत हा विश्वास या कार्यक्रमातून द्यावयाचा आहे,असे त्यांनी सांगितले.

या मदतीत आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासन निर्णयानुसार देय मदत, तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या सारख्या सामाजिक लाभाच्या योजनांचा लाभ तसेच सामाजिक संस्थांच्या व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले योगदान देऊन ही मदत वाटप करण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. 

267 कुटुंबांना मदतीचा हात...

 जिल्ह्यातील एकूण 267 जणांना ही मदत देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर, पैठण, फुलंब्री आणि सिल्लोड येथे सिल्लोड, सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात आली.

उद्या शुक्रवार दि. 17 रोजी सकाळी 10 वा. कन्नड येथे कन्नड, खुलताबाद तालुक्यातील व दुपारी 3 वा. लासूर स्टेशन येथे वैजापूर, गंगापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदत देण्यात येईल.

असा राबविला उपक्रम...

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने सेवा पंधरवाड्यानिमित्त तालुकास्तरावर केले. या सर्वेक्षणातून मदतीची गरज असणाऱ्या शेतकरी कुटुंबांची निवड करण्यात आली. शासकीय योजनेच्या लाभाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करुन एक किट तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 267 कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये 39,शेतकरी कुटुंब, फुलंब्रीमध्ये 30 पैठण तालुक्याचे 40 सिल्लोड येथील 62 सोयगाव येथील 12 कन्नड येथील 36 खुलताबाद येथील 4 शेतकरी आणि वैजापूर येथील 10 गंगापूर येथील 34 तसेच इतर उर्वरित सदस्य यांना मदत करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow