आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतली राजकीय पक्षांची बैठक
लोकसभा निवडणूक 2024;आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी
राजकीय पक्ष प्रतिनिधी; विभागप्रमुखांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
औरंगाबाद, दि.18(डि-24 न्यूज) लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक आदर्श आचारसंहिता अंमल सुरु झाला आहे. याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत नोडल अधिकारी तसेच याकालावधीत राजकीय पक्षांनी पाळावयाची नियमावली याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात बैठक पार पडली. सकाळच्या सत्रात सर्व नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील तसेच विविध विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
नोडल अधिकाऱ्यांनी तसेच विभागप्रमुख व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांच्या परिसरात कोणत्याही राजकीय पक्षाचे पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे आदी साहित्य तात्काळ हटविण्यात यावे. कार्यालयीन कामकाज करतांना आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली.
दुपारच्या सत्रात झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत , राजकीय पक्षांना आचारसंहिते विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मतदारांसाठी देण्यात येत असलेल्या मतदान केंद्रावरील सुविधा, मतदार संख्या,मतदार सहायता कक्ष, नामनिर्देशन, जाहिरात प्रमाणीकरण, खर्च निरीक्षण इ. विविध मुद्यांवर सादरीकरणाद्वारे संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी व जिल्हाधिकारी स्वामी यांनी माहिती दिली.
निवडणूक कालावधीत प्रचार करतांना सामाजिक सौहार्द व सलोखा अबाधित ठेवून प्रचार करावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी राजकीय पक्ष प्रतिनिधींना केले.
What's Your Reaction?