आदर्श घोटाळ्यातील दोन मालमत्ता काढल्या विक्रीला, गोरगरीब ठेवीदारांचे पैसे लवकर परत मिळणार

 0
आदर्श घोटाळ्यातील दोन मालमत्ता काढल्या विक्रीला, गोरगरीब ठेवीदारांचे पैसे लवकर परत मिळणार

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन मालमत्ता विक्रीची निविदा प्रसिद्ध; गोरगरीब ठेवीदांना लवकरच मिळणार पैसे

खासदार जलील यांचे आंदोलन व अधिकार्‍यांसोबत बैठक घेवुन दिलेल्या सुचनांची दखल

 

औरंगाबाद,दि.12(डि-24 न्यूज) खासदार इम्तियाज जलील यांनी मागील आठवड्यात जिल्हा सहनिबंधक, आदर्श पतसंस्थेचे प्रशासक मंडळ व संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेवुन आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या मालमत्ता लवकरात लवकर विक्री करुन गोरगरीब ठेवीदारांचे पैसे देण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने प्रशासकीय मंडळाने आदर्श पतसंस्थेच्या मालकीच्या कन्नड तालुक्यातील पिशोर येथील आदर्श मंगल कार्यालय व नाचनवेल येथील आदर्श सहकारी रुग्णालय या दोन मालमत्ताची लिलावाव्दारे विक्री बाबतची निविदा प्रसिध्द केली. त्यामध्ये मंगल कार्यालयाचे शासकीय मूल्यांकन हे 8 कोटी 36 लाख 69 हजार तर रुग्णालयाचे मूल्यांकन हे 4 कोटी 22 लाख 88 हजार असुन निर्धारित मूल्यांपेक्षा जास्तीची बोली लावणार्‍यांनाच या मालमत्ता विक्री केल्या जाणार आहेत.

          आदर्श मंगल कार्यालय हे गट नं. 26, पिशोर सिल्लोड रोड, पिशोर, ता.कन्नड येथे स्थित असुन सबब मंगल कार्यालयाचे 3754 स्क्वेअर मिटर मध्ये बांधकाम करण्यात आलेले आहे. तर आदर्श सहकारी रुग्णालय हे गट नं. 165, नाचनवेल ता. कन्नड येथे स्थित असुन सबब रुग्णालयाचे 1863 स्क्वेअर मिटर मध्ये बांधकाम करण्यात आलेले आहे.

          दोन्ही मालमत्ता विक्री निविदेचे वेळापत्रक, अटी व शर्ती यासह इतर तपशील शासनाच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. मालमत्ता विक्रीची प्रक्रिया संस्थेचे निंबंधक यांच्या मान्यतेनंतर पूर्ण होईल. निविदा भरण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 दुपारी 5 वाजेपर्यंत असुन इच्छुकांनी निविदा भराव्यात असे आवाहन प्रशासक समितीचे अध्यक्ष सुरेश काकडे यांनी केले आहे.

          आदर्श नागरी पतसंस्थेतील घोटाळेबाजांवर कारवाई करुन ठेवीदारांच्या ठेवी देण्यात याव्यात यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांसोबत विविध ठिकाणी तीव्र आंदोलन केले होते. खासदार जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदारांनी औरंगाबाद येथे झालेल्या मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीवर भव्य मोर्चा सुध्दा काढला होता.

          आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील 200 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पतसंस्थेचे संचालक आणि अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यापैकी अनेक आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांची सखोल चौकशी सुरु आहे. जिल्हा प्रशासनाने आदर्शच्या काही मालमत्तांवर जप्तीची कारवाईही केली आहे. आदर्श सहकारी पतसंस्थेत हजारो गरीब ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करुन संस्थेवर प्रशासक समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रशासक समिती कडुन कर्ज वसुली करण्यात येत आहे. येणे कर्ज रकमेपेक्षा ठेवींची रक्कम जास्त असल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी संस्थेच्या मालमत्तांची विक्री करण्यात येणार आहे. मालमत्ता विक्री झाल्यास कमी ठेव असणार्‍या बहुतांश ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत मिळू शकणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow