आरक्षणाच्या लढ्यात तरुणांचाही अन्नत्याग आंदोलन, दिपक चिकटे यांची तब्येत खालावली, उपचार घेण्यास नकार
आरक्षणाच्या लढ्यात तरुणांचेही अन्नत्याग आंदोलन, दिपक चिकटे यांची तब्येत खालावली...
जरांगे यांच्या पावलावर पाऊल टाकत करताहेत उपोषण
औरंगाबाद,दि.2(डि-24 न्यूज) "मी मनोज जरांगे..... " असे म्हणत मराठा समाजातील तरुणांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकत, आरक्षणाच्या या लढ्यामध्ये पाणी व अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. जोपर्यंत मनोज जरांगे उपोषण सोडणार नाही तोपर्यंत आम्हीही उपोषण सुरूच ठेवू, अशी भूमिका या तरुणांनी घेतली आहे. असेच चित्र जिल्हा व राज्यातील विविध गावांमध्ये दिसून येत आहे.
सकाळ मराठा समाजाच्या वतीने रामनगर- विठ्ठल नगर येथे लाईफ हॉस्पिटलच्या बाजूला दीपक चिकटे पाटील या तरुणाने आमरण उपोषण सुरू केलेले आहे. गुरुवारी त्यांच्या या उपोषणाचा सहावा दिवस होता. त्यांच्या या उपोषणाला रामनगर, विठ्ठल नगर, म्हाडा कॉलनी, प्रकाश नगर आदीसह परिसरातील मराठा समाज बांधव सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देत आहे. दीपक चिकटे यांची प्रकृती खालावल्याने सरकारी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याने, बुधवारी घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना आंदोलनस्थळी सलाईन लावली आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच क्रांती चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात जटवाडा येथील सरपंच गणेश लोखंडे पाटील यांनीही अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. त्यांचे प्रकृती खालावल्याने मंगळवारी त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा क्रांती चौक येथे येऊन आंदोलन सुरू ठेवले. सरकारचा उपचार एकदा घेतला आहे आता रुग्णालयात जाणारही नाही जे काय होईल ते आता इथेच होईल असे गणेश लोखंडे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे अशी मागणी, करत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात व राज्यात ठीक ठिकाणी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत तरुणांनी ही अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
झाल्टा फाटा येथे आकाश चव्हाण यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे गुरुवारी त्यांच्या या आंदोलनाचा सातवा दिवस होता. प्रकृती खालावल्यानंतरही त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. त्यांच्या या आंदोलनाला आडगाव बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य जगदीश ढवळे पाटील, अशोक लोखंडे मुकुंद शिंदे, विलास शेळके, हरी लोखंडे, अर्जुन दसपुते, ज्ञानेश्वर शिंदे, रामचंद्र डवले, सुरेंद्र शिंदे, मनोहर भालेकर,भाऊसाहेब दसपुते, अनिरुद्ध पठाडे, कैलास साळुंके, विठ्ठल म्हस्के यांच्यासह पंचक्रोशीतील सर्व गावातील नागरिक मोठया संख्येत उपस्थित होत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांकडून झाल्टा फाटा येथे रास्ता रोको, कॅण्डल मार्च, निदर्शने अशा विविध मार्गाने आंदोलने करण्यात येत आहे. मुकुंदवाडी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
What's Your Reaction?