इलेक्ट्रीक वायर बंडल चोरी करणाऱ्या दोन महीलांना अटक, 16 बंडल जप्त...
रात्रीच्या अंधारात इलेक्ट्रिक वायर चोरी; दोन महिला आरोपी जेरबंद, 16 बंडल जप्त
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.21(डि-24 न्यूज)- शहरातील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी रेकी करून मध्यरात्रीच्या सुमारास इलेक्ट्रिक वायरची चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या इलेक्ट्रिक वायरचे 16 बंडल हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विनायक आदर्श सोसायटी परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून अंदाजे 89 हजार 106 रुपयांच्या इलेक्ट्रिक वायरच्या 16 बंडलची चोरी झाली होती. याप्रकरणी फिर्यादी लक्ष्मण महंतप्पा वाडकर (वय 58, रा. केतकी अपार्टमेंट, गारखेडा परिसर) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक 175/2026, कलम 303(2) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचा तपास सुरू असताना जवाहरनगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस अंमलदार मारोती गोरे यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दोन महिला संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ज्योती संदीप चौघमल (वय 40, रा. मिलिंद नगर, रेल्वे पटरी जवळ, उस्मानपुरा) व रत्नमाला हिरामण ढवळे (वय 22, रा. नागसेन नगर, बुद्ध विहाराजवळ, उस्मानपुरा) यांचा समावेश आहे. या महीला भंगार वेचन्याचे काम करतात. आरोपींनी विनायक आदर्श सोसायटी परिसरातून इलेक्ट्रिक वायरची चोरी करून ती कटकट गेट परिसरातील सदफ काॅलनी येथे शेख समीर शेख शकील यास विकल्याची कबुली दिली आहे. विविध पोलिस ठाणे अंतर्गत आरोपी महीलांनी इलेक्ट्रीकल वायर बंडल व इतर सामान असा एकूण तीन लाखांची चोरी केल्याची कबुली दिली आहे. विविध पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे तपासात हे उघड झाले आहे. सदरील कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली महीला पोह रत्नमाला धुळे, पोअं मारोती गोरे, गुन्ह्याचे तपासक अंमलदार सफौ गणेश डोख, अनिल भाले यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
What's Your Reaction?