इस्लामने एक आदर्श जीवन प्रणाली या विश्वाला दिली - अब्दुल वाजिद कादरी
इस्लामने एक आदर्श जीवन प्रणाली या विश्वाला दिली.......... अब्दुल वाजिद कादरी : जाफराबाद येथे प्रेषित परिचय कार्यक्रम संपन्न
जाफराबाद, दि.29(डि-24 न्यूज )-इस्लाम हे कोण्या एका धर्माचे नाव नाही तर इस्लाम म्हणजे एक जीवन जगण्याची पद्धती आहे. इस्लामने जीवन जगण्याची एक आदर्श जीवन प्रणाली या संपूर्ण विश्वाला दिली. असे विचार जमाते इस्लामी हिंदचे प्रवक्ते अब्दुल वाजिद कादरी यांनी व्यक्त केले. रविवारी जाफराबाद येथे आयोजित प्रेषित परिचय कार्यक्रमात ते देश दुनियाची सद्य परिस्थिती व प्रेषित मोहम्मद पैगंबर या विषयावर बोलत होते. पुढे बोलताना कादरी म्हणाले की पवित्र धर्मग्रंथ कुराण व प्रेषित मोहम्मद यांची जीवनपद्धती या माध्यमातून संपूर्ण विश्वाला अपेक्षित न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, सेवाभाव, समता, संयम ही महान तत्वे प्रेषित मोहम्मदांनी दिली. लोकांना सांगितलेला प्रत्यक्ष शब्द स्वतः प्रेषित अगोदर जगले. स्त्रीभ्रुणहत्या, व्याभिचार, भ्रष्टाचार, अत्याचार इत्यादी बाबत आज पासून साडे चौदाशे वर्ष अगोदर प्रेषितांनी अतिशय कडक शब्दात ताशेरे ओढले होते. तुम्ही केलेल्या प्रत्येक क्रियाकर्माचा हिशोब तुम्हाला आपल्या परमात्म्यासमोर देणे आहे. त्याची भीती बाळगा. त्याच सर्वोच्च अल्लाहची इबादत करा. माणसाचं नातं थेट ईश्वराशी जोडण्याचं मोठं काम प्रेषित मोहम्मद यांनी केले. माणसाला माणसाच्या गुलामीतून मुक्त करण्याचे कामही त्यांनी आपल्या आदर्श वर्तनातून करून दाखविले. मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे असेही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य रमेश देशमुख, डॉ. पी.जी. देशमुख, शिवसेना नेते रमेश गव्हाड, राकापा नेते संजय लहाने यांनीही प्रेषित परिचय या विषयावर आपली मनोगते व्यक्त केली. मंचावर जाफराबादचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे, कुंडलिक मुठ्ठे, एड.वि.भा. काष्टे, शेख लुकमान, गट समन्वयक वसंत शेवाळे, मुख्याध्यापक उमेश दुनगहू यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात तालेब खान यांच्या कुराण पठनाने झाली. प्रास्ताविक मुमताज अली खान यांनी केले. सूत्रसंचालन असलम पठाण यांनी तर आभार शेख नसीम यांनी मानले. कार्यक्रमासाठी मोहम्मद इमरान, समीर शाह, सोहेल अहमद, शहाब, शेख रिजवान, काझी मोहम्मद ताहेर, एकबाल पठाण, इद्रीस खान, युनुस पठाण, तय्यब खान, अब्दुल मजीद आदींसह युथ मूवमेंट ऑफ महाराष्ट्र एसआयओच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.
What's Your Reaction?