एमआयएमला टक्कर देण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष कसा असावा कार्यकर्त्यांमध्ये चर्चा...!
एमआयएमला टक्कर देण्यासाठी काँग्रेस शहराध्यक्ष कसा असावा, कार्यकर्त्यांमध्ये चर्चा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.25(डि-24 न्यूज)- छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष नेमणुकीसाठी माजी आमदार व अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) सचिव विवेक बंसल यांनी शहरात भेट देऊन विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली असून, त्यांचा अहवाल दिल्ली दरबारात सादर केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
नवीन शहर जिल्हाध्यक्ष निवडीसाठी काँग्रेस पक्षात दिल्लीत मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.
शहर हे एमआयएम पक्षाचा गड बनल्याने, भविष्यात एमआयएमला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने योग्य व सक्षम युवा अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तीला शहर जिल्हाध्यक्ष करण्यात यावे, अशी मागणी पक्षातील अनेक पदाधिकारी करत आहेत.
महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 33 नगरसेवक निवडून आले व विरोधीपक्षनेते पद मिळाले तर काँग्रेसचा परंपरागत मतदार दुरावला जात असल्याने स्वबळावर एकच नगरसेवक काँग्रेसचा निवडून आले. तेही वंचितच्या गटात गेले असल्याने काँग्रेस पक्ष शहरात दुसऱ्या पक्षांच्या मुकाबल्यात दुबळा झाल्याने सक्षम व युवा अल्पसंख्याक शहराध्यक्षाची आवश्यकता आहे अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. थेट दिल्लीतून शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांची निवड होत असल्याने काही इच्छूकांनी फिल्डींग लावली खरी आता कोणाकडे हे नेतृत्व येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 30 ते 35 इच्छुक कार्यकर्त्यांनी या पदासाठी मागणी केली आहे माळ कोणाच्या गळ्यात पडते हे बघावे लागेल.
या मागणीचा प्रस्ताव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्याकडे लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी योग्य युवा अल्पसंख्यांक नेतृत्वाची गरज आहे तरच पक्ष संघटनेला पूर्ववैभव मिळेल असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
What's Your Reaction?