औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा बोलबाला, महाविकास आघाडीला धक्का...!

 0
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीचा बोलबाला, महाविकास आघाडीला धक्का...!

औरंगाबाद जिल्हा बँकेतही महायुतीचाच बोलबाला, महाविकास आघाडीला धक्का...

मविआचे एकमेव खासदार डॉ. कल्याण काळे विजयी...

महायुतीच्या गोटातून लढलेले मविआचे अंबादास दानवेंच्या गळ्यातही विजयाची माळ...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- अगोदर महापालिका नंतर जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायतीनंतर आता औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतदेखील महायुतीचा बोलबाला असल्याचे समोर आले आहे. बिनविरोध निवडून आलेल्यांसह रविवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने विरोधकांना धूळ चारत 20 पैकी 19 जागांवर विजय मिळवला तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे खा. कल्याण काळे हे एकमेव जागा काबीज करण्यात यशस्वी ठरले. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.

राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेली औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. अर्ज भरण्यापासूनच ही निवडणूक चर्चेची ठरली. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी महायुतीची इच्छा होती. तसा प्रयत्नही झाला. यात 8 जागा बिनविरोध करण्यात यशदेखील आले. यानंतर उर्वरित जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तगड्या रणनीतीमुळे महायुतीला बिनविरोधसह 20 पैकी 19 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. यात मंत्री अतुल सावे, आमदार विलास भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार रमेश बोरनारे, रामुकाका शेळके अशा दिग्गजांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या गोटातून निवडणूक लढलेले महाविकास आघाडीचे अंबादास दानवे हे देखील विजयी ठरले आहेत. निकालानंतर फटाक्यांच्या आतिषबाजिसह गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या नावाचा जयघोष केला.

आज सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. मतमोजणीच्या ठिकाणी सकाळपासूनच सर्व नेतेमंडळी आणि उमेदवार ठाण मांडून होते. एक एक करून निकाल हाती येताच कार्यकर्ते गुलाल उधळत विजयाचा जल्लोष करताना दिसून आले. निकाल पाहता एकंदरीत जिल्हा बँकेवर महायुतीची सत्ता राहणार आहे.

मविआला केवळ एक जागा... !

उर्वरित 12 जागांपैकी झालेल्या मतदानात काँग्रेसचे खा. डॉ. कल्याण काळे विजयी ठरले. त्यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागल्याने मविआला मोठा धक्का मानला जात आहे.

महायुतीचे विजयी झालेले 19 उमेदवार....

निकालापूर्वी महायुतीचे संजय शिरसाट, विलास भुमरे, रमेश बोरनारे, अर्जुन गाडे, अनिल बोरसे, अब्दुल समीर, दिनेश परदेशी, संदीप निकम या आठ उमेदवारांच्या बिनविरोध निवडून आल्यानंतर रविवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीच्या पॅनलचे अंबादास दानवे यांच्यासह अतुल सावे, अनुराधा चव्हाण, संजना जाधव, रामुकाका शेळके, रवींद्र काळे, अर्जुन पाटील, सुवर्णा जाधव, प्रभाकर काळे, शेषराव जाधव आणि मुक्ता तांगडे या 11 उमेदवार विजयी ठरले.

शिंदे गटाचे वर्चस्व...

जिल्हा बँक निवडणूकीच्या एकूण निकालात महायुतीने आपला विजयाचा झेंडा रोवला. यात सर्वाधिक जागांवर शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले. संजय शिरसाट, संदीपान भुमरे, संजना जाधव, विलास भुमरे, रमेश बोरनारे, अब्दुल समीर अशा दिग्गजांचा यात समावेश होता. तर भाजपकडून अतुल सावे, अनुराधा चव्हाण हे दिग्गज विजयी ठरले.

बहुतेक जागा महायुतीने बिनविरोध आणल्या आहेत. मात्र माझ्या मतदारसंघात बिनविरोधसाठी मतदार बळी पडले नाहीत. ही निवडणूक पैशांची लढाई होती मात्र माझ्या मतदारसंघांत मतदारांचे समर्थन मला मिळाले. 74 पैकी मला 48 ते विरोधकाला 26 मते पडली. हा मतदारांचा विजय आहे

- खा. कल्याण काळे (विजयी उमेदवार, मविआ)

सर्वच जागा बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न होता मात्र काही जागांवर ते शक्य झाले नाही. तरी एक जागा सोडल्यास सर्व जागांवर आम्हाला विजय मिळाला. आम्हाला शिंदे गट, अजित दादांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचे सहकार्य मिळाले. येणाऱ्या काळात बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम होईल.

- अतुल सावे (विजयी उमेदवार, महायुती)

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी 90 टक्के कौल आमच्या बाजूने दिला आहे. निवडणुकीत मी महायुतीच्या बाजूने नव्हतो तर शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने होतो. शेतकऱ्यांनी आम्हाला कौल दिला. हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे.

- अंबादास दानवे (विजयी उमेदवार, शेतकरी विकास पॅनल)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow