शिवाजीनगर परिसरात कोयता घेऊन दहशत माजवणारा सराईत आरोपी जेरबंद...!
शिवाजीनगर परिसरात कोयता घेऊन दहशत माजवणारा सराईत आरोपी जेरबंद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज)- शिवाजीनगर परिसरात भररस्त्यात हातात धारदार लोखंडी कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जवाहरनगर बीट मार्शल पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक धारदार कोयता आणि सुमारे ₹20,500 किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 4 जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शिवाजीनगर परिसरात सापळा रचण्यात आला. संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव दिपक ऊर्फ यश सचिन साबळे (वय 19, रा. इंदिरानगर, गारखेडा) असे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून धारदार कोयता व विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 281/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही मोबाईल हिसकावल्याचा गुन्हा दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर याआधीही विविध गुन्ह्यांची नोंद आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त नरेंद्र पापळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मोरे, मपोह उपाध्ये, डायल-112 मोबाईलचे पोह वामन नागरे, पोअं मारोती गोरे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
What's Your Reaction?