शहागंज, गांधी पुतळा हेरिटेज वाॅकला महापौर समीर राजूरकर यांची उपस्थिती...!

 0
शहागंज, गांधी पुतळा हेरिटेज वाॅकला महापौर समीर राजूरकर यांची उपस्थिती...!

गांधी पुतळा ते अप्पा हलवाई: आखाड्याची माती अन् पेढ्यांचा गोड इतिहास...! (हेरिटेज वॉक)

"ये शहर नहीं, एक जिंदा किताब है,

हर गली का यहाँ अपना एक ख्वाब है।

खोलो इतिहास के पन्नों को जरा अदब से,

यहाँ का हर जर्रा, कला का नायाब नमुना है।"

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.5(डि-24 न्यूज) -गांधी पुतळा ते अप्पा हलवाई या मार्गावर आयोजित केलेल्या या हेरिटेज वॉकमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या हृदयात वसलेल्या शहागंज, सराफा, धावणी मोहल्ला आणि पानदरीबा परिसराचा रंजक इतिहास उलगडत गेला. निमित्तही तितकेच खास होते – शहागंज येथील ऐतिहासिक गांधी पुतळ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात आणि शीख पंथाचे आदरणीय भाई दयासिंहजी यांचे 365 वे जयंती वर्ष! या दुग्धशर्करा योगायोगाने या वॉकला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली.

विठ्ठलाची पाऊले, उदासी आखाडा अन् गुरुद्वारी घुमला भक्तीचा गजर...!

इतिहासाची पाऊलखुणा शोधत निघालेला हा जथा जेव्हा शहराच्या गजबजलेल्या भागातून फिरला, तेव्हा जुन्या काळातील वैभव डोळ्यांसमोर जिवंत झाले. या सफारी दरम्यान भाविकांचे आणि इतिहासप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या खालील प्रमुख ठिकाणांना भेटी देण्यात आल्या: विठ्ठल मंदिर: शहरातील सर्वात जुने आणि प्राचीन मंदिर, जिथे शांततेचा अनुभव आला.

उदासी आखाडा: जुन्या काळातील साधू-संतांच्या वास्तव्याची आणि परंपरेची साक्ष देणारी जागा.

भाई दयासिंहजी गुरुद्वारा: शीख पंथाचा पवित्र इतिहास आणि सेवाभावाची शिकवण देणारे अध्यात्मिक केंद्र.

बाखरिया आखाडा: मातीचा सुवास आणि कुस्तीची परंपरा...

या वॉकचा सर्वात थरारक आणि मराठमोळा अनुभव ठरला तो म्हणजे उस्ताद बाबूलालजी बाखरिया यांच्या कुस्ती आखाड्याला दिलेली भेट! लाल मातीचा सुवास आणि अंगात संचारणारे स्फुरण घेऊन सर्व इतिहासप्रेमी या आखाड्यात पोहोचले.

आखाड्याची गाथा अन् ऐश्वर्याच्या शब्दांतील शौर्याचा ऐतिहासिक ठेवा...!

यावेळी ऐश्वर्या बाखरिया यांनी उपस्थितांशी संवाद साधताना आखाड्याचा इतिहास अत्यंत ओघवत्या आणि प्रभावी भाषेत मांडला. त्यांनी कुस्तीच्या आखाड्यातील एक-एक वैशिष्ट्य, डावपेच, लाल मातीची महती आणि बाखरिया उस्तादांची परंपरा उपस्थितांना अत्यंत सुंदररीत्या समजावून सांगितली. ऐश्वर्या यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणामुळे आखाड्यातील जुन्या मल्लांचे पराक्रम आणि कुस्तीची वैभवशाली परंपरा उपस्थितांच्या डोळ्यांसमोर हुबेहूब उभी राहिली, ज्याने सर्वांची मने जिंकून घेतली.

महापौर समीर राजूरकर म्हणाले, "छत्रपती संभाजीनगरचा इतिहास, संस्कृती आणि वारसा ही आपल्या शहराची खरी ओळख आहे. हेरिटेज वॉकसारख्या उपक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या शहराचा समृद्ध इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येतो. वारसा जपणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमधून आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाबद्दलचा अभिमान अधिक दृढ होईल."

मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन या ऐतिहासिक उपक्रमाला शहराच्या प्रथम नागरिकांसह अनेक दिग्गजांची साथ लाभली. प्रमुख उपस्थिती: छत्रपती संभाजीनगरचे महापौर समीर राजूरकर, नगरसेवक सचिन खैरे, ऋषिकेश जैस्वाल, नगरसेविका कीर्ती शिंदे, उप आयुक्त अंकुश पांढरे, नंदकिशोर भोंबे यांच्यासह अनेकानी या वॉकला उपस्थित राहून वारसा जतन करण्याच्या मोहिमेचे कौतुक केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow