कटकट गेट ते पोलिस मेस रस्त्यावर अघोषित पार्किंग, फंक्शन हाॅलने अडवला रस्ता

 0
कटकट गेट ते पोलिस मेस रस्त्यावर अघोषित पार्किंग, फंक्शन हाॅलने अडवला रस्ता

कटकट गेट - पोलिस मेस रस्ता ‘अघोषित पार्किंग’

फंक्शन हाॅलमुळे वाहतूक कोंडी...

छत्रपती संभाजिनगर (औरंगाबाद), दि.2(डि-24 न्यूज) प् शहरातील कटकट गेट ते पोलिस मेस दरम्यानचा रस्ता सध्या 'अघोषित पार्किंग' बनला असून, वाहनचालक आणि स्थानिक नागरिक यांना रोजच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करुन शासनाने चकचकीत सिमेंट रस्ता बनवला परंतु रस्त्यावरील फंक्शन हाॅल व हाटेलसमोर अवैध पार्कींग ने रस्ता गिळंकृत केल्याने वाहन चालवणे कठीण बनले आहे.

 या मार्गावर असलेल्या बऱ्याचशा फंक्शनकडे पार्किंगची सोय नसल्याने पाहुण्यांची वाहने सर्रास रस्त्यावर उभी केली जातात. परिणामी या परिसरात दिवसरात्र वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या मार्गावरील बहुतांश फंक्शन हाॅलकडे स्वतःची पार्किंग व्यवस्था नाही. फक्त दोन-तीन कार्यालयांनीच रस्ता अडवू नये याची खबरदारी घेतली आहे. उर्वरित कार्यालयांकडून मात्र रस्त्यालाच स्वतःची जागा समजून वाहने उभी केली जातात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना कोंडीत अडकावे लागते. या कारणांमुळे वादावादी, शाब्दिक चकमकी आणि काही वेळा मारहाणीसुद्धा घडल्याचे स्थानिकांनी सांगितले.

नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, "जेव्हा एखादं फंक्शन हाॅल मोठ्या रकमेचे भाडे घेते, तेव्हा त्यांना पाहुण्यांसाठी पार्किंगची सुविधा पुरवणं अपेक्षित असतं. जर त्यांच्याकडे जागा नाही, एक तर त्यांनी पार्किंग सुविधा उपलब्ध करावी नाही तर मोकळ्या मैदानात आपला व्यवसाय चालवावा, अंडरग्राऊंड पार्किंग ऐवजी सार्वजनिक रस्त्याचा बिनधास्त वापर केला जातो."

महानगरपालिकेने पे अँड पार्क योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही योजना केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था ढासळली आहे आणि प्रशासनाच्या उदासीनतेकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे.

वाहतूक पोलीस आणि महापालिकेने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. विशेषतः ज्या व्यावसायिक इमारतींमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा नागरिकांचा संयम सुटण्यास वेळ लागणार नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow