काॅपीमुक्त अभियानासाठी ठोस पावले उचला, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे अधिका-यांना निर्देश...
कॉपीमुक्त अभियानासाठी ठोस पावले उचला
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज)-छत्रपती संभाजीनगर विभागातील काही परीक्षा केंद्रांवर घडलेल्या गैरप्रकारांच्या बातम्या राज्यात पोहोचल्या असून, यामुळे विभागाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. त्यामुळे यापुढे अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक जबाबदारीने काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले.
दहावी व बारावी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विभागातील पोलीस उपमहानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प, पोलीस अधिक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक, एसएससी बोर्डाचे अध्यक्ष व सचिव, तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्यासमवेत विभागीय आयुक्त श्री. पापळकर यांनी आढावा बैठक घेतली.
बैठकीत काही केंद्रांवर कॉपी व गैरप्रकार झाल्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या घटनांमुळे वृत्तपत्रांमध्ये नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्याने विभागाच्या कामकाजात सुधारणा करण्याची गरज असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत होणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष, भरारी पथके व निरीक्षण व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे निर्देश आयुक्त पापळकर यांनी दिले.
बैठकीत सांगण्यात आले की, बीड जिल्ह्यात 103 परीक्षा केंद्रांसाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष व 103 पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तसेच सर्व केंद्रांवर नियमित तपासणी केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर व बीड येथील काही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, संबंधित संस्थेच्या दोषी शिक्षकांविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्याबाबत कळविले असल्याचे संबंधित शिक्षणाधिकारी यांनी बैठकीत सांगितले.
यापुढे कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार झाल्यास संबंधित संस्थेतील दोषींविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा देण्यात आला. केवळ शिक्षकांवरच नव्हे, तर सर्व संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
कॉपीमुक्त अभियानासाठी करत असलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हाधिकारी,नांदेड, लातूर, परभणी, जालना यांनी बैठकी दरम्यान दिली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी परीक्षा या कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. संवेदनशिल परीक्षा केंद्रावर बैठेपथक नियुक्त करुन त्यांचा नियमित आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले.
पोलीस प्रशासनाने गैरप्रकार घडलेल्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याबाबत त्वरेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी मांडलेले मुद्देही महत्त्वाचे असल्याचे नमूद करण्यात आले. इतर जिल्ह्यांतील अडचणींचाही आढावा घेण्यात आला.
“विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता परीक्षा कॉपीमुक्त, शांत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी व संस्था चालकांनी समन्वयाने काम करावे,” असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले. योग्य नियोजन व कठोर अंमलबजावणी झाल्यास आगामी दहावी व बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडतील, असा विश्वास आयुक्त पापळकर यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?