कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजबांधव रस्त्यावर...

 0
कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजबांधव रस्त्यावर...

कोळी महादेव, कोळी मल्हार जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर छत्रपती संभाजीनगरात प्रतिकात्मक टाळे ठोको आंदोलन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10 (डि-24 न्यूज) :- मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रकरणांमध्ये कथित अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ, परभणी जिल्ह्याच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या कार्यालयासमोर सोमवारी शांततापूर्ण व सनदशीर पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सिडको येथील राजीव गांधी स्टेडीयम येथे कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने जमा झाले यामध्ये महीला व विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. पोलिस बंदोबस्तात हा मोर्चा शांततेत जात पडताळणीसाठी कार्यालयावर धडकला. परंपरागत कपडे परिधान करून डफळी वाजवून हात फलके घेत आंदोलक उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राची अनेक प्रकरणे प्रलंबित असून, या जमातींना घटनात्मक आरक्षणापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रश्नाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात मराठवाड्यातील अंजिठा-बालाघाट डोंगररांगांतील कोळी महादेव व कोळी मल्हार समाजातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, युवक-युवती, विद्यार्थी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

आंदोलकांनी 1950 पूर्वीच्या नोंदी, महसूल व जनगणना अभिलेख तसेच उपलब्ध जुन्या दस्तऐवजांचा योग्य पद्धतीने विचार करून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच पुणे, ठाणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील जुन्या नोंदींचा विचार करून समानतेच्या तत्त्वानुसार मराठवाड्यातील कोळी महादेव व कोळी मल्हार समाजाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

समितीच्या कामकाजात पारदर्शकता यावी, सुनावणीची व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध करून द्यावी तसेच तपासणी समितीच्या अध्यक्ष व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रतिनिधींच्या अर्जांवर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान संविधानाने दिलेल्या लोकशाही हक्कांचा वापर करून शासन व प्रशासनाचे लक्ष समाजाच्या प्रश्नांकडे वेधण्यात आले. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण वातावरणात पार पडले. संबंधित मागण्यांचे निवेदन शासन व प्रशासनाकडे सादर करण्यात आले. आंदोलकांनी प्रतिकात्मक टाळे ठोको आंदोलन केले.

कोळी महादेव, कोळी मल्हार समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न तातडीने मार्गी लावून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow