ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी काढला मुकमोर्चा...!

 0
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मागणीसाठी काढला मुकमोर्चा...!

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1 सप्टेंबर (डि-24 न्यूज) – ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हा मुकमोर्चा सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद येथून शिस्तबद्ध पद्धतीने निघाला.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कामकाजादरम्यान होणारे हल्ले, धमक्या व मानसिक त्रासाच्या घटनांमुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायत अधिकारी श्री. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

या आहेत प्रमुख मागण्या

शिवरे ग्रामपंचायत घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.

ग्रामसभेच्या बैठकींची संख्या व कार्यपद्धतीबाबत योग्य नियोजन करावे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनधिकृत चित्रीकरण व सोशल मीडियासाठी होणारे रेकॉर्डिंग यावर मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात.

संवेदनशील व वादग्रस्त ग्रामपंचायत बैठकींसाठी प्रशासनाकडून सशुल्क अथवा विनामूल्य पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा.

कृषी, आरोग्य, समाजकल्याण आदी विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित विभागांवर सोपवावी.

विविध शासकीय योजनांच्या लाभार्थी निवडीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करून तालुका/पंचायत समिती स्तरावर अंतिम निवड करण्याची व्यवस्था करावी. 

या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हाध्यक्ष भिमराव दांगे पाटील, जिल्हा सचिव प्रवीण नलावडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या जीविताचे रक्षण आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे

केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow