बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सी विरोधात मनसे अक्रामक, आरटीओ कार्यालयावर काढला धडक मोर्चा...!
बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात मनसे वाहतूक सेनेचा मोर्चा
इंजिनिअरिंग कॉलेज ते आरटीओ कार्यालयापर्यंत रिक्षांसह मोर्चा; कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.1 (डि-24 न्यूज) – शहरातील रिक्षाचालकांच्या रोजगारावर परिणाम करणाऱ्या बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सी प्रवासी वाहतुकीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने इंजिनिअरिंग कॉलेज ते प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कार्यालयापर्यंत रिक्षांसह मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर शहरात हजारो रिक्षाचालक-मालक आपल्या रिक्षेच्या व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र, शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षाचालकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होत असल्याचे मनसे वाहतूक सेनेने निवेदनात म्हटले आहे. या समस्येबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही अपेक्षित स्वरूपात ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष मनीष जोगदंडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याची मागणी करण्यात आली.
मनसे वाहतूक सेनेच्या प्रमुख मागण्या...
शहरात सुरू असलेली बेकायदेशीर प्रवासी वाहतूक तातडीने बंद करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. रॅपिडो बाईक टॅक्सी मुळे रिक्षाचालकांचा रोजगार बुडत आहे हि वाहतूक तात्काळ थांबवावी.
रिक्षा मीटर दरवाढ तात्काळ लागू करावी.
रिक्षा चालकांना प्राधान्य देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
कंपनी बसमधून होणारी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक बंद करून संबंधितांवर कारवाई करावी.
आरटीओ कार्यालयातील प्रत्येक रिक्षा रेकॉर्डनुसार त्याच्या फाईलवरील कामकाज व आवश्यक कागदपत्रांची स्पष्ट माहिती देणारे फलक लावावेत.
आरटीओ कार्यालयातील एजंटगिरीला आळा घालून कार्यालय दलालमुक्त व पारदर्शक करावे.
छत्रपती संभाजीनगर ते पुणे व इतर मार्गांवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बेकायदेशीर Bla/BlaCar टॅक्सी तसेच इतर वाहनांवर तपासणी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
“रिक्षाचालकांच्या रोजगारावर घाला घालणारी कोणतीही बेकायदेशीर प्रवासी वाहतूक महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना खपवून घेणार नाही. केवळ आश्वासन नको, ठोस कारवाई हवी,” अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मोर्चात मनीष जोगदंडे पाटील, जाकीर पठाण, राजेश राठोडकर, प्रभू प्रधान, मोहम्मद फारूक, अस्लम शेख, राहुल शिंदेगोटे, पवन फडतळकर यांच्यासह मनसे वाहतूक सेनेचे पदाधिकारी व रिक्षाचालक सहभागी झाले होते.
What's Your Reaction?