महापालिका निवडणुक, आक्षेपांवर आज झाली सुनावणी...

प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचनांवर सुनावणी पुर्ण...
प्रभागांचे नकाशे, व्याप्ती चुकल्याचे सर्वाधिक आक्षेप
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) - छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून दाखल झालेल्या 552 हरकती व सूचनांवर बुधवारी मजनूहिल येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांच्या उपस्थितीत सुनावणीची प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रभाग रचनेवरील नकाशे व व्याप्ती चुकल्याचे सर्वाधिक आक्षेप दाखल झाल्याचे समोर आले. विरोधकांनी व काही इच्छूकांनी सुनावणीत सहभाग घेतल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी प्रभाग रचना बनवल्याचा आरोप केला हि प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी केली. वंचितचे नेते अफसरखान, कृष्णा बनकर, एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी, जावेद खान, भाई इम्तियाज, आपचे लतिफ शेख, उबाठाचे नेते राजू वैद्य, भाजपाचे समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे, जालिंदर शेंडगे, तकी हसन खान, मार्टी कृती समितीचे एड अजहर पठाण व कार्यकर्त्यांनी सुनावणीत आपले म्हणणे मांडले. इच्छूकांची यावेळी गर्दी दिसून आली. आक्षेपकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. आता त्यावर शासन आणि निवडणुक आयोग काय निर्णय घेईल, याकडे आक्षेपकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे जाहीर केल्यानंतर महापालिका निवडणुक प्रभाग निहाय घेण्याचा निर्णय घेतला. एका प्रभागात चार सदस्य अशी रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले. त्यानुसार प्रभाग रचना तयार करून शासनाला सादर करण्यात आली होती. त्यास शासनाने व निवडणुक आयोगाने मंजुरी दिल्यानंतर 22 ऑगस्ट रोजी रात्री या रचनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली, व ही प्रभाग रचना महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या. 4 सप्टेंबरपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत एकूण 552 आक्षेप दाखल झाले. या आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी राज्य शासनाने महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांची नियुक्ती केली. बुधवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी मनपा प्रशासक जी. श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त विकास नवाळे, अपर्णा थेटे, नंदकिशोर भोंबे, नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे आदींची उपस्थिती होती.
असे आहेत आक्षेप
प्रभाग रचनेवर सर्वाधिक आक्षेप हे व्याप्ती व नकाशे चुकल्याचे होते. काही जणांनी नैसर्गिक हद्दी गृहीत धरण्यात आलेल्या नाहीत, प्रभाग रचना करताना जवळच्या वसाहतींकडे दुर्लक्ष करून दूरच्या वसाहतींचा प्रभागात समावेश केला. नकाशे व व्याप्तीमध्ये तफावत आहे. प्रभागांच्या नकाशामध्ये तो भाग असलातरी त्यामध्ये व्याप्तींचा त्यात समावेश नाही, ईबीची मांडणी करताना त्यावर असलेले नंबर टाकण्यात आलेले नाही. आक्षेपांवर सुनावणी घेण्यापूर्वी शासनाने 30 ऑगस्ट रोजी गॅझेटमध्ये अध्यादेश काढल्यावरही काहींनी आक्षेप घेतला. डॉ. अनुपकुमार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. महापालिका प्रशासनाचा अभिप्राय घेवून शासनाला सादर करण्यात येईल असे यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
What's Your Reaction?






