चिकलठाणा विमानतळ विकासासाठी ठोस पावले उचला - खासदार डॉ. कल्याण काळे

चिकलठाणा विमानतळ विकासासाठी ठोस पावले उचला – खासदार डॉ. कल्याण काळे यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज) चिकलठाणा विमानतळाच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत विमानतळाच्या पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता, पर्यावरणीय समस्या आणि नवीन विमानसेवा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
देश-विदेशातील नवीन विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना...
खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नवीन आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील उद्योग, पर्यटन आणि व्यावसायिक प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळावी यासाठी हे प्रयत्न वेगाने हाती घेतले जातील.
विमानतळ विस्तारासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती
विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या कारवाईला गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे धावपट्टी आणि टर्मिनल सुविधांचा विस्तार करून मोठ्या विमानांचे उड्डाण शक्य होईल.
सल्लागार समितीची मंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन...
विमानतळाच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी लवकरच सल्लागार समितीची मंत्री महोदयांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन खासदार डॉ. काळे यांनी दिले. या बैठकीत निधी, नियोजन आणि अंमलबजावणीसंबंधी निर्णय घेतले जातील.
ई-बस सेवा आणि वाहतूक सुधारणा
शहरातील प्रवाशांना विमानतळावर सहज पोहोचता यावे म्हणून मनपाने ई-बस सेवा सुरू करावी, अशी सूचना देण्यात आली. तसेच, जालना रस्ता आणि शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलिस आयुक्तांना योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
विमानतळ परिसरातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश
विमानतळ आणि परिसराची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी पोलिस चौकी सुरू करून तिथे पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, असे निर्देश देण्यात आले.
सुखना नदीवरील पक्ष्यांची संख्या आणि अपघात टाळण्यासाठी उपाययोजना
विमानतळाला लागून असलेल्या सुखना नदीवर पक्ष्यांची संख्या वाढत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना देण्यात आल्या.
विमानतळ विकासाच्या कामांना गती
या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी ठोस कृती आराखडा सादर करून त्याची अंमलबजावणी वेळेत करण्याचे आदेश मिळाले. विमानतळ विकासासाठी आवश्यक निधी आणि प्रकल्प मंजुरीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळाचा विकास वेगाने होईल, नवीन विमानसेवा सुरू होतील आणि शहराची देश-विदेशाशी चांगली जोडणी निर्माण होईल, असा विश्वास खासदार डॉ. कल्याण काळे यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार अनुराधाताई चव्हाण, समिती सदस्य किरण पाटील डोणगावकर दुष्यंत पाटील, गौरीशंकर देवीधन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?






