जालन्यात धनगर आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी यांनी केले शांततेचे आवाहन
जालन्यात धनगर आंदोलनाला हिंसक वळण...
जिल्हाधिकारी यांचे शांतता राखण्याचे आवाहन
जालना, दि. 21(डि-24 न्यूज) धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी कायदा व सुव्यवस्था भंग होईल, असे कृत्य करु नये. नागरिकांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. आपल्या जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज धनगर समाजबांधवांनी काढलेल्या मोर्चा प्रसंगी आयोजकांनी निवेदन स्विकारण्यासाठी केलेल्या मागणीनुसार स्वत: निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार हे आयोजकांच्या तीन प्रतिनिधींसह मोर्चाच्या ठिकाणी निघाले होते. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील गेटजवळ पोहोचेपर्यंत मोर्चातील काही आंदोलक आक्रमक झाल्यामुळे ते मागे फिरले. झालेली घटना ही गैरसमजातून झालेली आहे. सुरुवातीपासून प्रशासनाने सांमजस्य आणि सहकार्याची पूर्णपणे भूमिका घेतलेली आहे. प्रशासन कालपासून मोर्चाच्या आयोजकांसमवेतही चर्चेमध्ये होते. दरम्यान आयोजकांकडून निवेदन स्विकारण्यात आले आहे. त्यांना शासनाने घेतलेल्या निर्णयाबाबतही माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच कुणाला त्रास होईल, अशी कृती करु नये. हिंसक मार्गाने आंदोलने करु नयेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये, हिंसक घटनांना उत्तेजना न देता आपले गाव व शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत. जालना जिल्ह्यात शांतता भंग होईल, असे कृत्य कुणीही करु नये. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
आज धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. यावेळी दगडफेक करण्यात आली असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. आता तेथे शांतता आहे. पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
What's Your Reaction?