जिल्हा परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता, महायुतीत फुट, अध्यक्षपदी अविनाश गलांडे, उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड...
जिल्हा परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता, महायुतीत फुट,
अध्यक्षपदी अविनाश गलांडे, उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल बिनविरोध...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.18 (डि-24 न्यूज) - जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत उलटफेर दिसून आले. या निवडणुकीत महायुतीत फुट झाल्याने भाजपाला एकहाती सत्ता मिळवता आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षाबाबत ठरल्यानंतरही ऐनवेळी शिंदेसेनेने उबाठाच्या सदस्यांशी संपर्क केल्याने नाराज झालेल्या भाजपने शिंदेसेनेलाच बाजुला ठेवून आणि महाविकास आघाडीचे सदस्य फोडून मिनीमंत्रालयावर एकहाती सत्ता मिळविली. शिंदेसेना आणि उबाठाच्या सदस्यांनी निवडीवर बहिष्कार घातल्याने त्याचा थेट फायदा भाजपाला मिळाला आणि दोन्ही पदांवर भाजपच्या सदस्यांची निवड झाली. या निवडीनंतर भाजप-शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायतीत सर्वाधिक सदस्य निवडून आले. महापालिकेत महापौरपद भाजपला गेल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळावे यासाठी शिंदेसेकडून आग्रह धरण्यात येत होता. मात्र, याला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून विरोध होता. पहिले अडीच वर्षे अध्यक्षपद कोणाकडे असावे या मुद्यावरून महायुतीत एकमत होत नव्हते. शेवटी हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गेला. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाबाबत निर्णय झाला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड केवळ औपचारिकता ठरेल असे वाटत होते. परंतु ऐनवेळी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उबाठाच्या सदस्यांशी संपर्क केला. तसेच अपक्ष आणि भाजपच्या सदस्यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे नाराज झालेल्या भाजपने खेळी करीत उबाठा तसेच अपक्ष सदस्य फोडले. ज्या सदस्यांच्या पाठींब्यावर भाजपला शह देण्याचा प्रयत्न शिंदेसेनेकडून करण्यात येत होत ऐनवेळी तेच सदस्य गायब झाल्याचे दिसून आले. बहुमताचा आकडा जुळत नसल्याने अखेर शिंदेसेनेने या निवडीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. तर उबाठ्या सदस्यांना तठस्त राहण्याची भूमिका घेतली. शिंदेसेना, उबाठाचे सदस्य निवड प्रक्रियेला हजरच राहिले नाही. अध्यक्ष पदासाठी भाजपचे अविनाथ गलांडे तर उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र जैस्वाल या दोघांचेच अर्ज आले होते. दोघांचेच अर्ज आल्याने मतदान घेण्याची वेळ आली नाही. शेवटी पिठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे आणि अध्यक्षपदी अविनाश गलांडे, उपाध्यक्ष पदी जितेंद्र जैस्वाल यांची निवड झाल्याचे घोषीत केले. या घोषणेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा जल्लोष केला.
अध्यक्ष, उपाध्यक्षच्या निवडीवरून महायुतीत फुट पडल्याचे दिसून येत आहे. तसेच दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर विश्वासघात केल्याचा आरोपही होत आहे. स्थानिक पातळीवर महायुतीत फुट पडली असली तरी त्याचा परिमाण राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता कमीच आहे.
आम्ही विश्वासघात केला नाही - मंत्री अतुल सावे
पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार विलास बापू भुमरे, आमदार बोरणारे यांच्या सोबत भाजपाच्या नेत्यांनी बैठक घेऊन अध्यक्षपद भाजपाला व उपाध्यक्ष पद शिवसेनेला देण्याचे ठरले होते परंतु भाजपचे काही पुरस्कृत सदस्यांशी व अपक्षांशी शिवसेनेने संपर्क करायला सुरुवात केली. आम्हाला भाजपा सोबत न जाता सत्ता स्थापन करायची असे आम्हाला कळले. त्यांनी आजच्या निवडणुकीत बहिष्कार टाकून विश्वासघात त्यांनी केला आम्ही नाही. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांना त्यांच्या मुलाला अध्यक्ष बनवायचे होते ते त्यांना जमले नाही अशी टीका त्यांचे नाव न घेता सावेंनी केली. भाजपा सोबत अपक्ष मिळून 32 सदस्य असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्ष भाजपाचे बिनविरोध निवड झाली. जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला अशी प्रतिक्रिया सावेंनी यावेळी दिली.
भाजपाने विश्वासघात केला याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होईल - अब्दुल सत्तार
जिल्हा परिषद अध्यक्षपद शिवसेनेला व उपाध्यक्ष पद भाजपाला देण्याचे जेष्ठ मंत्री उदय सामंत व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत ठरले. तरीही भाजपाच्या नेत्यांनी आज झालेल्या निवडणुकीत विश्वासघात करुन गद्दारी केली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला महापौर पद मिळाले तर जिल्हा परिषदेत अध्यक्षपद शिवसेनेला मिळायला हवे होते तसे झाले नाही. याचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर नक्कीच होईल अशी प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी
दिली.
What's Your Reaction?