जिल्हाधिकारी यांनी घेतला औरंगाबाद लोकसभा मतमोजणी केंद्राचा आढावा
 
                                मतमोजणी केंद्रात सर्व आवश्यक सुविधांची
सज्जता करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज):- औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे नियोजित मतमोजणी केंद्र असलेल्या इमारतीची आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी पाहणी केली.मतमोजणी केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निकषांप्रमाणे सर्व आवश्यक सुविधांची सज्जता करा, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
मतमोजणी केंद्राच्या पाहणीच्या वेळेस पोलीस आयुक्त मनोज लोहिया.पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मनीष कलवानिया. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, सातारा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गिरी,यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. तेथेच आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी स्वामी यांनी मतमोजणी केंद्रासंदर्भात आढावा घेतला.
आढावा बैठकीत त्यांनी निर्देश दिले की, मतमोजणी केंद्रावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आपत्ती व्यवस्थापन, पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा व पर्यायी जनरेटर, इंटरनेट याची व्यवस्था करण्यात यावी. मतमोजणी केंद्राच्या परिसरामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप करण्यात येणार यावे. मतमोजणी केंद्र आणि परिसर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व सुविधांनी सज्ज करावे. सुविधा उभारणी दि.११ मे पर्यंत पूर्ण करावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
उपस्थित सर्व अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी मतमोजणी केंद्रावरील विविध कक्षासाठी जागेची पाहणी केली. मीडिया कक्ष, निकाल ऐकायला जमणाऱ्या लोकांना नेमून दिलेल्या जागा उपलब्धतेबाबत पाहणी यावेळी केली. ऊन, अवकाळी पाऊस इ. हवामानासंदर्भातील शक्यतांच्या अनुषंगाने सर्व तयारी प्रशासनाने करून मतमोजणी केंद्र सर्व सुविधा सज्ज करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            