जिल्ह्यात डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा - पालकमंत्री संजय शिरसाट

जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशउत्सव साजरा करावा _पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.24 (डि-24 न्यूज)- गणेशोत्सव हा यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करत आहोत. या महोत्सवाची तयारी पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने उत्तम पद्धतीने केली आहे, यामध्ये गणेश मंडळांनी देखील पुढाकार घेऊन शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात डीजे ऐवजी पारंपारिक वाद्याचा वापर करत डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीच्या बैठकीत केले.एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जालना मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड आमदार प्रदीप जयस्वाल महानगरपालिका आयुक्त जी .श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी ,पोलीस आयुक्त प्रवीण पवार, गणेश मंडळाचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार, यांच्यासह विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
शिरसाट म्हणाले की, प्रशासनाने विविध समस्या सोडवून गणेशोत्सवाची तयारी केली आहे ही आनंदाची बाब असून गणेश उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या कुटुंबातील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी गणेश मंडळाने डीजे मुक्त उत्सव साजरा करावा . डीजे ऐवजी पारंपारिक वाद्य, ढोलताशे व इतर वाद्याचा वापर करून उत्साहाचे वातावरण ठेवावे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने अमलीपदार्थची विक्रीस प्रतिबंध तसेच यावरील कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
छत्रपती संभाजीनगर हे विकासाच्या वाटेवर वेगाने वाटचाल करत असून यासाठी सर्व पक्ष, सर्व पदाधिकारी, नागरिक यांनी उत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्याची शांतता व प्रगतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित गणेश मंडळ पदाधिकारी व नागरिकांना त्यांना केले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महापालिकेने गणेश विसर्जनाची तयारी कृत्रिम तलावाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी करावी .यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबतही पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. खासदार कल्याण काळे यांनी लेझर लाईटचा वापर गणेशोत्सवा दरम्यान करू नये, त्याचप्रमाणे अमली पदार्थांचे विक्री प्रतिबंध तसेच यामध्ये स्थानिक पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई करण्याचेही आवाहन यावेळी केले. खासदार डॉ. भागवत कराड यांनी गणेश मंडळांनी अवयदान त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर यासारख्या विविध समाज उपयोगी उपक्रमाची अंमलबजावणी करून वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याबाबतही आवाहन केले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, गणेश उत्सव हा एकतेचा उत्सव असून या उत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण करणारे संदेशाचे देखावे व इतर नाविन्यपूर्ण देखावे गणेश मंडळांनी करावे. व राज्य शासनाच्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन नामांकन पाठवावे. वृक्षारोपण सारख्या मोहिमेत सहभाग घेऊन प्रत्येक गणेश मंडळांनी पुढाकार घेण्याचे ही यावेळी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात आले.
महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या काही परवानग्या या मोफत दिल्या जाणार असून,.ज्या ठिकाणी परवानगी घेतली आहे त्यांनी फक्त यावेळी संबंधित गणेश मंडळाने माहिती देणे आवश्यक आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. महापालिका गणेश उत्सव दरम्यान पाणी, रुग्णवाहिका, रुग्णालयातील उपचार, शहरातील मुख्य ठिकाणी विद्युत रोषनाई विसर्जनाच्या वेळी निर्माल्याचे संकलन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे .फिरते शौचालय, वेगवेगळ्या ठिकाणी मूर्ती दान व गणेश मूर्तीचे विसर्जन यासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था महापालिकेच्या मार्फत करण्यात आले असल्याचे सांगितले. गणेश उत्सव हा नागरिकांना आनंददायी व्हावा यासाठी महापालिका प्रयत्न करत असून अडचणी असेल तर नागरिकांनी महापालिकेच्या संपर्क कक्षाच्या माध्यमातून मदतही देण्याचे आश्वासन जी. श्रीकांत यांनी दिले.
पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून डीजेमुक्त आणि लेझरचा लाईट वापर न करता गणेश उत्सव साजरा करावा. तसेच समाज माध्यमातून विविध चुकीच्या पोस्ट किंवा माहिती प्रसारित करू नये, जेणेकरून शहर आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही एकोपा जपण्यासाठी काम करावे असे आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केले. या समन्वय आढावा बैठकीमध्ये विविध गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या वीज वितरण करणाऱ्या तारांचे योग्य व्यवस्थापन ,तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबरोबरच. अमली पदार्थाची विक्री व सेवन करणाऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाईबाबत ही सूचना पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनास केल्या. सर्व विभागाने योग्य ती कारवाई करून शांततेत, समन्वयाने गणेश उत्सव साजरा करण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली.
What's Your Reaction?






