दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक, स्काॅर्पीओसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक; स्कॉर्पिओसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)-
बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीएमआयसी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत फिरत असलेल्या तिघा संशयितांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत स्कॉर्पिओ वाहन, मोबाईल, लोखंडी कटर, हेक्सा ब्लेड व इतर साहित्य असा 5 लाख 20 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील हे पथकासह गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत डीएमआयसी सेक्टर क्रमांक 19, शिवनाई शिवार परिसरात पाच जण स्कॉर्पिओ वाहनातून दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्कॉर्पिओ वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने वाहन भरधाव पळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले. त्यावेळी दोन संशयित पसार झाले, तर तिघांना ताब्यात घेण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रईस शेख शहीर (वय 32), अमोल काशीनाथ खरात (वय 30) आणि रईस शेख युनूस (वय 32, सर्व रा. अजवा नगर, वाळूज, ता. गंगापूर) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून स्कॉर्पिओ वाहन (एमएच-41-सी-8005), दोन विवो कंपनीचे मोबाईल, दोर, लोखंडी कटर, स्क्रू ड्रायव्हर, हेक्सा ब्लेड आदी साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 441/2026 नुसार बीएनएस कलम 310(4), 310(5) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनजितसिंग सेना करीत आहेत.
सराईत गुन्हेगारांचा समावेश
पोलीस तपासात अटक आरोपींपैकी रईस शेख शहीर याच्यावर MIDC वाळूज पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे, तर अमोल काशीनाथ खरात याच्याविरुद्ध वाळूज, MIDC वाळूज आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, दरोडा व इतर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोउपनि जगनाथ उबाळे, संजीवन कदम, पोहेकाॅ अमोल मगर, पोना पवन चव्हाण, पोअं योगेश वाघमोडे व स्वप्नील दिलवाले यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?