रात्री 10.30 नंतर पब, बार आणि डिजेवर निर्बंध, पोलिस आयुक्तांचे नवीन आदेश...!

 0
रात्री 10.30 नंतर पब, बार आणि डिजेवर निर्बंध, पोलिस आयुक्तांचे नवीन आदेश...!

रात्री 10.30 नंतर पब, बार आणि डीजेवर निर्बंध; पोलीस आयुक्तांचे नवे आदेश...परमीट रुम बंद करण्याची रात्री उशिरा दिड वाजताची वेळ आदेशात दिलेली आहे यामुळे शहरात गुन्हेगारी वाढणार नाही का...? अशीही चर्चा शहरात आता सुरू झाली आहे...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- शहरातील सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त प्रविण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 163 अंतर्गत नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शहरातील पब, बार, परमिट रूम, रेस्टॉरंट, हॉटेल, बँक्वेट हॉल, लॉन तसेच खुल्या मैदानांमध्ये होणारे डीजे व संगीत कार्यक्रमांवर रात्री 10.30 नंतर बंदी राहणार आहे.

नवीन आदेशानुसार संबंधित आस्थापनांना रात्री 10.30 वाजेपर्यंतच मनोरंजन करता येईल. डीजे, लाईव्ह म्युझिक आणि इतर मनोरंजन कार्यक्रमही त्यानंतर सुरू ठेवता येणार नाहीत. कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, डीजे पार्टी किंवा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पोलीस विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आयोजकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

सीसीटीव्ही अनिवार्य...

सर्व संबंधित आस्थापनांमध्ये प्रवेशद्वार, निर्गमनद्वार आणि महत्त्वाच्या ठिकाणी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग किमान 15 दिवस सुरक्षित ठेवणे आवश्यक राहील.

अल्पवयीनांना प्रवेशबंदी...

18 वर्षांखालील व्यक्तींना परमिट रूममध्ये प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच 25 वर्षांखालील ग्राहकांना मद्य देण्यापूर्वी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा अन्य शासकीय ओळखपत्र तपासणे संबंधित आस्थापनांची जबाबदारी असेल.

टेबल किंवा मंचावर नृत्यास मनाई...

ग्राहकांना टेबल किंवा मंचावर नृत्य करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. व्यावसायिक कलाकार किंवा डीजे कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास त्याची माहिती व आवश्यक कागदपत्रे पूर्वीच पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करावी लागणार आहेत. विदेशी कलाकारांच्या बाबतीत पासपोर्ट व इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती देणेही बंधनकारक असेल.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही आस्थापनात बेकायदेशीर कृत्य, मारहाण किंवा इतर गुन्हेगारी प्रकार आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow