दिव्यांगांना मनपा प्रशासक जी.श्रीकांत यांनी दिला आधार, स्वावलंबी बनविण्यासाठी देणार काम करण्याची संधी
514 दिव्यांगांना उदरनिर्वाह भत्ता सुरू करण्याच्या मा. प्रशासकांच्या सूचना
दिव्यांगाना आत्मनिर्भर बनविण्यासाठी राबविणार विविध उपाययोजना...
औरंगाबाद, दि.16(डि-24 न्यूज) दिव्यांगाना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महानगरपालिका कटिबध्द आहे आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी स्मार्ट सिटी कार्यालय येथील दिव्यांगांच्या शिष्टमंडळ बैठकीत सांगितले.
आज स्मार्ट सिटी कार्यालय येथे दिव्यांग शिष्टमंडळ यांच्या बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शहरात दिव्यांग कल्याण भवन बनवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच दोन योजनांचे लाभार्थी असलेल्या 517 दिव्यांगांना महापालिकेच्या माध्यमातूनही उदनिर्वाह भत्ता देण्याचा निर्णय गुरूवारी स्मार्ट सिटी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत घेतला.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार्या 517 दिव्यांगांचे अनुदान रोखण्याचा निर्णय पालिकेने यापूर्वी घेतला होता. यासंदर्भात जाहीर प्रगटन देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. यासंदर्भात गुरूवारी सकाळी स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक झाली. यावेळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी शासनाचे निर्देश तपासून, मार्गदर्शन मागवून संबंधितांना त्यांचा भत्ता देण्याचे आदेश दिले. सोबतच दिव्यांगांसाठी विविध योजना राबवण्याची घोषणा केली.या बैठकीस मा.अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील,उप आयुक्त नंदा गायकवाड,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, दीव्यांग शिष्टमंडळ प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. दिव्यांगांसाठी सिडको एन-12 येथे पालिकेची मोडकळीस आलेली शाळेची इमारत पाडून त्याजागी दिव्यांग कल्याण भवन उभारले जाईल. येथे दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण दिले जाईल. तसेच त्यांच्या आरोग्य सेवेसाठी एक थेरपी सेंटर देखील सुरू केले जाईल. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
स्वच्छतागृह, निवारागृह दिव्यांग चालवणार...
पालिकेच्या माध्यमातून कांचनवाडी येथे सुरू करण्यात येणारा पेट्रोल पंप हा दिव्यांग चालवणार आहेत. येथे जे मतिमंद मुलांचे आई किंवा वडील यांना पेट्रोल पंप व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी देण्यात येईल. तसेच शहरातील काही स्वच्छतागृह व पालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले बेघर निवारागृह देखील दिव्यांगांना चालवण्यासाठी दिले जातील, असेही प्रशासकांनी नमूद केले.
3 डिसेंबर दिव्यांग दिनी ट्रेनिंग कोर्स सुरू करणार
3 डिसेंबर 2023 रोजी दिव्यांग दिनी फिरते स्टॉल लावण्यात येवून या दिवसाची सुरुवात करण्यात येणार आहे. या ठिकाणी विविध कोर्सेस चे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात शिवण काम इत्यादी कोर्सेस चा समावेश आहे.
नेहरू भवन व इतर ठिकाणी गाळे घेताना सबंधित मालकाने जर दिव्यांग व्यक्तीला कामावर ठेवले तर मनपा तर्फे त्यास सवलत दिली जाणार आहे. तसेच महानगरपालिकेतर्फे
निरामई योजने अंतर्गत मतिमंद मुलांचे हफ्ते भरण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
स्मार्ट सिटी कार्यालय येथे बैठकीसाठी आलेल्या अक्षय बुट्टे नामक दिव्यांग व्यक्तीची प्रशासक यांनी आस्तेवाईक पणे चौकशी केली व त्याच्या सोबत फोटो ही काढला.
प्रशासक यांनी दिव्यंगाना आत्मनिर्भर बनविण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचे उपस्थित दिव्यांग शिष्टमंडळ यांनी विशेष कौतुक केले व आभार व्यक्त केले.
What's Your Reaction?