निवडणुकीसाठी 20 हजार अधिकारी कर्मचारी सज्ज

 0
निवडणुकीसाठी 20 हजार अधिकारी कर्मचारी सज्ज

निवडणूक कर्तव्याकरीता…अभ्यासोनी प्रकटावे!

६१ सत्रातून २० हजारांहून अधिक अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षित

औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी (दि.१३) होऊ घातले आहे. निवडणूक यंत्रणा या कार्यासाठी सज्ज असून उद्या (दि.१२) पासून निवडणूक पथके आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना होतील. मात्र ही सगळी तयारी करण्यासाठी तब्बल ६१ प्रशिक्षण सत्रे झाली आहेत. या प्रशिक्षण सत्रात २० हजाराहून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आपली पूर्वतयारी केली आहे.

 जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन दि.१ मार्च पासून राबत आहे. दि. १६ मार्चरोजी देशभरात निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली. तेव्हापासून जिल्हाप्रशासनाची तयारी गतिमान झाली. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित करण्यापासून विविध नोडल अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करतांनाच त्यांना त्या त्या विषयाशी संबंधित प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे या चमूचे कर्णधार. अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्यासह विविध कक्षप्रमुख अधिकारी कर्मचारी या तयारीत जुंपले होते. प्रशिक्षण देण्यासाठी विषयनिहाय साधन व्यक्ति, प्रशिक्षणाचे वेळापत्रक, स्थळ, त्यासाठीचे साधन साहित्य इ. ची जुळवाजुळव करुन वेळेवर हे सगळे प्रशिक्षणे आयोजित करणे. त्यासाठी संबंधित विषयाचे प्रशिक्षणार्थी अधिकारी- कर्मचारी उपस्थित ठेवणे याची जबाबदारी प्रशिक्षण व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी अभिराम डबीर यांच्याकडे होती. 

 विविध नोडल अधिकारी, त्यांच्या विषयाशी संबंधित माहिती, स्वीप उपक्रम, कायदा सुव्यवस्था, मतदान यंत्रे हाताळणी, मतदान प्रक्रिया, मतदान यंत्रांची देखरेख, त्यांचे यादृच्छिकीकरण, माध्यम विषयक , आरोग्य अधिकाऱ्यांचे. मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधा अशा विविध बाबींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या व्यतिरिक्त विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणे झाली. अशी तब्बल ६१ प्रशिक्षण सत्रे होऊन त्यातून २० हजार ५२४ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. 

 या प्रशिक्षणातून प्राप्त ज्ञान, माहिती, प्रात्यक्षिकाच्या बळावर ही सगळी यंत्रणा प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला उद्या (दि.१२) पासून सामोरे जाणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow