परभणी रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाने प्रवाशाचा जीव वाचवला...!

 0
परभणी रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाने प्रवाशाचा जीव वाचवला...!

परभणी रेल्वे स्थानकावर RPF जवानाने प्रवाशाचा जीव वाचवला;

तर दुसऱ्या घटनेत सेलू येथे हरवलेली पर्स प्रवाशाला परत

नांदेड, दि.6(डि-24 न्यूज)-

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी ऑपरेशन जीवन रक्षा आणि ऑपरेशन अमानत अंतर्गत तत्पर व उल्लेखनीय कार्य करत प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

परभणी स्थानकावर प्रवाशाचा जीव वाचवला :

दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी हेड कॉन्स्टेबल HC-604 श्री मोगरे पद्माकर हे परभणी रेल्वे स्थानकावर गुन्हे प्रतिबंधक कर्तव्य बजावत असताना गाडी क्रमांक 12788 नागरसोल–नरसापूर एक्सप्रेस ही गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आली होती.

यावेळी जनरल डब्यात प्रवासी चढत असताना एक प्रवासी अचानक घसरून प्लॅटफॉर्म आणि गाडीमधील धोकादायक फटीत अडकला. ही घटना लक्षात येताच HC मोगरे पद्माकर यांनी अत्यंत तत्परता व धाडस दाखवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या प्रवाशाला सुरक्षितपणे बाहेर काढले. त्यांच्या वेळेवर केलेल्या कार्यामुळे त्या प्रवाशाचा जीव वाचला आणि संभाव्य दुर्घटना टळली. सदर प्रवासी शेख मोहम्मद असे असून ते परभणी ते नांदेड असा प्रवास करत होते.

ऑपरेशन अमानत अंतर्गत हरवलेली पर्स प्रवाशाला परत :

दुसऱ्या घटनेत, सौ. अविषा, राहणार पुणे, या आपल्या पतीसोबत गाडी क्रमांक 17629 हडपसर एक्सप्रेसने पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करत होत्या. छत्रपती संभाजीनगर येथे उतरताना त्यांनी चुकून आपली पर्स गाडीतच विसरली.

पर्स हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी रेल्वे हेल्पलाईन क्रमांक 139 वर तक्रार नोंदवली. मिळालेल्या संदेशानुसार HC-305 श्री शिवानंद मांते यांनी सेलू रेल्वे स्थानकावर संबंधित डब्याची तपासणी केली आणि पर्स शोधून काढली.

त्यानंतर प्रवाशाशी संपर्क साधून त्यांना RPF चौकी, सेलू येथे बोलावण्यात आले आणि पर्स सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात देण्यात आली. सदर पर्समध्ये रोख रक्कम, आधार कार्ड, पॅन कार्ड, अ‍ॅक्सिस बँकेचे डेबिट कार्ड आणि HDFC बँकेची कार्डे होती.

या दोन्ही घटनांमधून RPF कर्मचाऱ्यांची तत्परता, सतर्कता आणि प्रवाशांप्रती असलेली मानवी भावना अधोरेखित होते.

दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग या RPF कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करीत असून प्रवाशांना सुरक्षित, संरक्षित आणि प्रवासी-अनुकूल रेल्वे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow