प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी, नियोजनबद्ध औद्योगिक विकासासाठी सहकार्याची जी.श्रीकांत यांची ग्वाही...
औद्योगिक गुंतवणुकीबरोबर पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य द्या...
प्रशासन उद्योजकांच्या पाठीशी; नियोजनबद्ध औद्योगिक विकासासाठी सहकार्याची ग्वाही...
सीआयआयच्या 16 व्या परिषदेत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आवाहन...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. 5 (डि-24 न्यूज) : औद्योगिक विकास हा आर्थिक प्रगतीचा आधार असला तरी त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करताना पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठीही उद्योगांनी योगदान द्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी भारतीय उद्योग महासंघाच्या (सीआयआय) पदाधिकाऱ्यांना केले.
येथील हॉटेल गेटवेमध्ये आयोजित सीआयआयच्या 16 व्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सीआयआयचे श्रीकांत मुंदडा, आरती कुचिभाटला, दीपक गर्ग, पराग सातपुते, नरेंद्र कुलकर्णी, पुष्कर हाते यांच्यासह विविध उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, काही दशकांपूर्वी बजाज उद्योग समूहाने छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक विकासाचा पाया घातला. त्यानंतर शहरात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून देश-विदेशातील नामांकित कंपन्यांनी येथे गुंतवणूक केली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असून भविष्यातही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात शाश्वत आणि संतुलित औद्योगिक विकासाला प्रोत्साहन दिले जात आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कामगार व नागरिकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रशासनाकडून प्राधान्याने सुरू आहे. उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर असून कोणत्याही समाजकंटकांकडून त्रास होत असल्यास उद्योजकांनी थेट व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करावी. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्योजक आणि प्रशासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे नियोजनबद्ध व गतिमान औद्योगिक विकास साध्य होऊ शकतो, असे नमूद करत त्यांनी औद्योगिक परिसरातील विनापरवाना अथवा अनधिकृत बांधकामे असलेल्या उद्योजकांनी शासनाने दिलेल्या मुदतीत गुंठेवारी नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन केले.
परिषदेत उपस्थित उद्योग प्रतिनिधींनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपलब्ध असलेल्या औद्योगिक वातावरणाची प्रशंसा केली. टोयोटा, जेएसडब्ल्यूसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांनी येथे गुंतवणूक केल्याने शहराची औद्योगिक ओळख अधिक बळकट झाली आहे. भविष्यात आणखी मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा असून छत्रपती संभाजीनगर हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी विभागीय आयुक्तांनी उद्योग क्षेत्रातील अनियमितता दूर करण्याबरोबरच पर्यावरणाच्या शाश्वत संवर्धनासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा, वृक्षारोपण, जलसंधारण, ऊर्जा बचत आणि हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केले. उद्योग, पर्यावरण आणि समाज यांच्यातील समतोल राखत आदर्श औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरला आज "इलेक्ट्रिक व्हेईकल कॅपिटल" म्हणून नवी ओळख मिळत असून भविष्यात हे शहर देशाच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे झळकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?