मतदान केंद्रावर पाळणाघर सुविधा पुरविण्यात महीला बालविकास विभागाची भुमिका महत्वाची - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
मतदान केंद्रावर पाळणाघर सुविधा पुरविण्यात महिला बालविकास विभागाची भुमिका महत्त्वाची-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज) मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. विशेषतः ज्या स्तनदा माता, लहान बाळ असणाऱ्या माता आहेत. त्यांच्या बालकांसाठी मतदान केंद्र इमारतीत पाळणा घर सुविधा द्यावयाची आहे. हे पाळणाघर संचालन करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पार पाडावयाची आहे,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
मतदान केंद्रांवर महिला मतदारांना द्यावयाच्या विविध सुविधांची अंमलबजावणी करण्यासाठी आज महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका बालविकास अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ग्रामीण व शहरी भागातील महिलांना मतदान केंद्रावर मतदान करतांना कडेवर असलेले बाळ सांभाळून रांगेत उभे राहणे गैरसोईचे होऊ शकते. त्यासाठी तितका वेळ त्यांची बालके सांभाळण्यासाठी पाळणाघर स्थापित करण्यात येईल. मतदान केंद्राच्या इमारतीत हे पाळणा घर असेल. तेथे महिला व बालविकास विभागाची महत्त्वाची जबाबदारी असेल. तसेच, महिला बालकल्याण विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मतदार जाणीव जागृतीच्या माध्यमातुन मतदानाचे महत्त्व लक्षात आणून द्यावे. जिल्ह्यात काही ठिकाणी महिला मतदान केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. ही मतदान केंद्र पूर्णतः महिला अधिकारी कर्मचारी संचलित करतील,असेही त्यांनी सांगितले.
What's Your Reaction?