मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम, मतदारांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

 0
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम, मतदारांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम...

मतदार यादी निर्दोष करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न;...

मतदारांनी सहकार्य करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छ संभाजीनगर(औरंगाबाद) दि.6 (डि-24 न्यूज)- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीची पुनरीक्षण प्रक्रिया सुरु असून आज जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. मतदारांनी नावे, मतदान केंद्र, नाव समाविष्ट करणे, वगळणे इ. प्रक्रिया दि.२९ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावीत. मतदार यादी अधिकाधिक निर्दोष करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून त्यास मतदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले. 

 मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

 बैठकीत माहिती देण्यात आली की, दि.१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याअनुषंगाने आज दि.६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांना दि.६ ते २० ऑगस्ट या कालावधीत आपल्या हरकती व दावे नोंदविता येतील. त्यासाठी दि.१०, दि.११, दि.१७ व १८ रोजी विशेष अभियान मतदान केंद्रांवर राबविण्यात येईल. याची नोंद मतदारांनी घ्यावी. मतदारांनी दाखल केलेल्या हरकती व दावे दि.२९ पर्यंत निकाली काढण्यात येतील व दि.३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 

 सद्यस्थितीत जिल्ह्यात १६ लाख १८ हजार ९४ पुरुष, १४ लाख ७१ हजार ६५९ महिला तर १३६ इतर असे एकूण ३० लाख ८९ हजार ८८९ मतदार आहेत. जिल्ह्यात ग्रामिण भागात १११३ तर शहरी भागात १७८५ असे एकूण २८९८ब मतदान केंद्र होते. मतदान केंद्र पुनर्चनेनंतर आता रामिण भागात १६९ तर शहरी भागात १९७ असे ३६६ मतदान केंद्र वाढले असून आता एकूण मतदान केंद्र ३२६४ इतके झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १६४१२ पुरुष, १० हजार ७६४ महिला तर १२ इतर असे एकूण २७ हजार १८८ दिव्यांग मतदार आहेत. तर ३२ हजार २७२ पुरुष, ४७ हजार ७५३ महिला असे एकूण ८२ हजार २५ मतदार हे वयवर्षे ८० पेक्षा जास्त वय असलेले मतदार आहेत. तसेच सेवा मतदार २४८५ पुरुष व ६३ महिला असे एकूण २५४८ आहेत.

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, यासोबतच मतदान यंत्रांचे प्रथमस्तरीय तपासणी सुरु आहे. त्याठिकाणीही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहुन प्रक्रिया पाहता येईल. मतदारांनी आपल्या नजिकच्या मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव पहावे. त्याचा तपशिल तपासावा. त्यात काही बदल करावयाचे असल्यास , मतदान केंद्र बदलावयाचे असल्यास वा नाव वगळणे, नवीन नाव नोंदविणे इ. सर्व प्रक्रिया या आत्ताच करुन घ्याव्या. याबाबत सजगता बाळगावी. दुबार नावे असलेल्यांनी आपली नावे स्वतःहून वगळण्यासाठी अर्ज द्यावा,असेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow