महीला अत्याचारावर शिक्षेसाठी कायदे कडक करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

 0
महीला अत्याचारावर शिक्षेसाठी कायदे कडक करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कायदे कडक करणार- नरेंद्र पंतप्रधान मोदी...नेपाळ दुर्घटनेत जळगावच्या 27 भाविकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता त्यांच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली जाहीर, राज्यात 50 लाख लखपती दीदी बणवण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी आपल्या भाषणात केला....

जळगाव, दि.25(डि-24 न्यूज) महिलांना घरात बसून E-FIR दाखल करता येणार आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आम्ही राज्य सरकारसोबत असून महिला अत्याचारावर शिक्षेसाठी कायदे अधिक कडक करणार.

महिलांवर अत्याचार करणारा वाचला नाही पाहिजे, असे पंतप्रधान मोदींनी जळगावातील लखपती दीदी मेळाव्यात संबोधीत करताना सांगितले.

मराठीतून भाषणाची सुरूवात

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत केली. नेपाळ दुर्घटनेतील पीडित कुटुंबांच्या प्रती संवेदना व्यक्त केली. घटनेनंतर भारत सरकारने त्वरित नेपाळ सरकारशी संपर्क साधला. मंत्री रक्षा खडसे यांना नेपाळला जायला सांगितले. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचे पार्थिव विमानाने जळगावला आणण्याची व्यवस्था केली, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. नेपाळ घटनेतील जखमींवर उपचार सुरू आहेत. ते लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मोदी म्हणाले. घटनेतील पीडित कुटुंबांना केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे मदत करेल, अशा शब्दात त्यांना धीर दिला.

महिलांसाठीच्या योजना वाढवणार...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता हे सर्व ट्रेलर आहे, यापुढे आम्ही महिलांसाठीच्या योजना वाढवणार आहोत. ग्रामीण भागातील महिला उत्पन्न वाढीसह देश मजबूत करत आहेत. आधुनिक शेतीसाठी नारीशक्तीला नेतृत्व देत आहोत, यातून नवीन विचार पुढे येईल असे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी मुलींसाठी बंदी असलेले क्षेत्र आम्ही आता सुरू करत आहोत. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठे बजेट ठेवलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज रविवारी जळगावमध्ये ‘लखपती दिदी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी यावेळी कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. माझी नजर जिथपर्यंत जाते तेथेपर्यंत आई-बहिणींचा महासागर दिसत आहे. हे दृश्य मनाला आनंद देणारे असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच यावेळी संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधील किस्सा सांगितला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, महाराष्ट्राचे संस्कार हे विश्वभरात पसरले आहेत. पोलंडमध्ये मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. तिथले लोक महाराष्ट्रीयन लोकांचा सन्मान करतात. पोलंडमधील अनेक माता बहिणींना कोल्हापुरातील राज घराण्याने आश्रय दिला. जळगाव ही संत मुक्ताईची भूमी आहे.

महाराष्ट्रातील संस्कृतीचा डंका जगभरात वाजला आहे. मी युरोपमधून पोलंडला गेलो. त्या ठिकाणी मला महाराष्ट्राचे दर्शन झाले. महाराष्ट्राची संस्कृती दिसली. पोलंडचे लोक महाराष्ट्रातील लोकांचा खूपच सन्मान करतात. पोलंडच्या राजधानीत त्यांनी कोल्हापूर मेमोरियल उभारले आहे. पोलंडच्या लोकांनी हे मेमोरियल कोल्हापूरच्या लोकांची सेवा आणि सत्कारच्या भावनेला सन्मान देण्यासाठी बनवले आहे. महाराष्ट्रातील गौरवशाली संस्कृती आणि संस्काराचे दर्शन मला सर्वत्र होते, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले

लाखो जण बचत गटांसोबत...

लखपती दिदीचे हा महामेळावा होत आहे. माझ्या सर्व लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो बचत गटांसाठी 6 हजार कोटींहून अधिकची रक्कम जाहीर केली आहे. लाखो बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील भगिनींना सुद्धा कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे. या पैशांतून लाखो बहिणींना लखपती दीदी बनवण्यात मदत मिळेल. सर्वांना माझ्या शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

महिला सक्षमीकरण्याचे स्वप्न पंतप्रधानांनी पूर्ण केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येथे आज रविवारी ‘लखपती दीदी’ महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित महिला वर्गाला संबोधित केले. यावेळी महिला सक्षमीकरण, लाडकी बहिण योजनेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले. महिला सक्षम करण्याचे केवळ स्वप्न पाहिले नाही, तर हे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले, असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना, महिलांना प्रोत्साहन दिले. तुमच्यासाठी हा आनंद सोहळा आहे. जळगाव ही सोन्याची भूमी आहे. इथले सोने बावनकशी आहे. इथल्या बहिणीही सोन्यापेक्षा सरस आहे. 11 लाख महिला लखपती होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी योजनेचाही त्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे बहिणींच्या चेहर्‍यावरचा आनंद फुलला आहे. तीन मोफत सिलिंडर देण्याची योजना सुरू केली. मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची योजनाही हाती घेतली आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासाला आम्ही प्राधान्य देत आहोत. महिला सक्षम करण्याचे केवळ स्वप्न पाहिले नाही तर मोदींनी हे स्वप्नपूर्ण केले आहे. 10 कोटी महिलांना त्यांनी आत्मनिर्भर केले आहे, असं ते म्हणाले.

नेपाळ बस अपघातातील 27 मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत करण्याचीही जळगावात मुख्यमंत्र्यांची घोषणा केली.

जिल्ह्यातील 27 भाविकांचा नेपाळ बस अपघातात मृत्यू झाला होता. मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात जाहीर केली. जळगाव जिल्ह्यातील 27 भाविकांचा मृत्यू...

भुसावळसह तालुक्यातील वरणगाव, तळवेल तसेच परिसरातील 90 भाविक हे नेपाळ येथे देवदर्शनासाठी गेल्यानंतर भाविकांची एक बस नेपाळच्या तनहून जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत नियंत्रण सुटल्याने कोसळली होती. या अपघातात गोरखपूरच्या चालक-वाहकासह 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मन हेलावणारा हा अपघात शुक्रवार, 23 ऑगस्ट सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडला होता. या अपघातात एक तरुणी बेपत्ता आहे. अन्य 16 भाविक जखमी झाले आहेत. यादुर्दैवी घटनेतील मयताच्या वारसाला

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या अपघातामध्ये मयत झालेल्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्याची माहिती दिली होती. यानंतर आता राज्य सरकारने देखील मदत जाहीर केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी या कार्यक्रमात नेपाळमधील बस अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सर्वांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा केली आहे. यामुळे आता केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने देखील अपघातातील मयतांच्या वारसांना मदत जाहीर केली आहे.

 जळगाव जिल्ह्याचे चित्र बदलणार...नार-पार योजनेसाठी निविदा काढण्याला मान्यता ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुजलाम सुफलाम करणार्‍या नार-पार योजनेला मान्यता देण्यात आली असून आजच कॅबीनेटच्या बैठकीत योजनेसाठी निविदा काढण्यात येईल, अशी घोषणा जळगावात लखपती दीदी मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की, वाघूर प्रकल्पासाठी दोन हजार 288 व पाडळसे प्रकल्पाला चार हजार 890 कोटी रुपये मंजूर केल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्यातील भाविकांना वाहिली आदरांजली

फडणवीस यांनी नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांप्रती शोकसंवेदना व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुजलाम सुफलाम करणारी योजना नार-पारला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली असून आज कॅबीनेट बैठकीत निविदा काढण्यास मान्यता देण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकर्‍यांना शेतीला पाणी मिळेल. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी संख्येचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. महिला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आल्या तरच भारत विकसित होईल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्यातील 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

आपल्या राजकीय जीवनात लाखोंच्या संख्येने प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला आज पंतप्रधानांच्या स्वागतासाठी आल्याने आपण भारावून गेल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येथे म्हणाले. जळगावात आयोजित लखपती दीदी मेळाव्यात त्यांनी महिलांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी देशातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प केला असून त्यातील किमान 50 लाख महिलांना महाराष्ट्रात लखपती दीदी बनविण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रचंड पाऊस व मात्र महिलांचा उत्साह कायम

अजित पवार म्हणाले की, देशाचे लाडके पंतप्रधान जळगावात आल्यानंतर पाऊस असतानाही काना-कोपर्‍यातून महिला स्वागतासाठी उपस्थित राहिल्या आहेत. राज्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वांच्या सहकार्याने 50 लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प करूया, असेही अजित पवार म्हणाले. महिलांवर कोणतीही जवाबदारी टाकली तर त्या यशस्वीपणे पेलतात, असेही ते म्हणाले.

व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, यांच्यासह केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, , आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow