मालमत्ता करावरील शास्ती माफी योजना आता सर्व मालमत्तांना लागू

 0
मालमत्ता करावरील शास्ती माफी योजना आता सर्व मालमत्तांना लागू

मालमत्ताकरावरील शास्ती माफी योजना आता सर्व मालमत्तांना लागू

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज) -

आगामी भारतीय स्वातंत्र्य दिन व मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक महोदय यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार देण्यात आलेल्या स्वेच्छाधिकार वापर करून दिनांक 10/7/2025 रोजी आदेश पारित करून हद्दीतील निवासी व मिश्र वापर असणाऱ्या मालमत्तांवरील मालमत्ता कराच्या थकबाकीवर आकारलेली शास्तीमधून दिनांक 15 जुलै ते दिनांक 16 ऑगस्ट 2025, 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2025 या कालावधीत अनुक्रमे 95% व 75% माफी जाहीर केली आहे.

त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट व मंत्री अतुल सावे यांनी शास्ती माफी ही योजना व्यापारी मालमत्तांनाही लागू करावी यासाठी पत्राद्वारे सुचवले होते. यावर आयुक्त तथा प्रशासक महोदयांनी सकारात्मक निर्णय घेत, सदर योजना सर्व घटकांना लागू करण्याची सूचना दिली.

औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने आयुक्तांना निवेदन देवून उक्त शास्ती योजना मनपा हद्दीतील व्यापारी, व्यवसायिक मालमत्तांना देखील लागू करण्याची विनंती केली होती. त्यातून सध्या अडचणीत असलेल्या व्यापारी बांधवांना शास्तीच्या योजनेत सुट मिळून व्यापारी आपली थकबाकी मनपाकडे भरण्यास प्रवृत्त होतील असे निवेदनकर्त्यांचे मत होते. तसेच मराठवाडा स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन(मसिआ) व चेंबर ऑफ मराठवाडा एंड एॅग्रीकल्चर(सी.एम.आय.ए.) यांनी चिकलठाणा व रेल्वेस्टेशन एमआयडिसी उद्योगांना सूट दिल्यास त्यांना दिलासा मिळेल असे निवेदन आयुक्तांना दिले होते.

वरील सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने निर्णय घेत आयुक्त तथा प्रशासक महोदयांनी शास्ती से आझादी योजना महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्व मालमत्ता व्यवसायिक, औद्योगिक, शैक्षणिक व इतर मालमत्तांचा समावेश आहे. त्यामुळे दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत थकित कराचे भरणा करणाऱ्या महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्तांना 95% शास्ती माफी लागू असेल.

सर्व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ताधारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी वरील सवलतीचा लाभ घेऊन विनंती केली असून आपल्या मालमत्तेचा कर भरणा करावा व आपल्या शहराच्या विकासात हातभार लावावा. अशी माहिती उपायुक्त कर संकलन विवेक नलगे यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow