मुख्यमंत्री लाडकि बहीण योजनेत जिल्ह्यातील 5 लाख महीलांनी भरले अर्ज

 0
मुख्यमंत्री लाडकि बहीण योजनेत जिल्ह्यातील 5 लाख महीलांनी भरले अर्ज

‘मुख्यमंत्रीः माझी लाडकी बहीण योजना’

तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्येच्या गावांत...

उद्यापासून (दि.२५) तीन दिवस नोंदणी शिबिरांचे आयोजन 

५ लाख १३ हजार १३० बहिणींची नोंदणी पूर्ण

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.24(डि-24 न्यूज) ‘मुख्यमंत्रीःलाडकी बहीण योजना’ या योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांची नोंदणी करण्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी उद्या म्हणजेच गुरुवार दि.२५ पासून तीन दिवस तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये नोंदणी शिबिरांचे आयोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. दरम्यान आजअखेर ५ लाख १३ हजार १३० बहिणींची नोंदणी झाली असल्याची माहितीही देण्यात आली.

 ‘मुख्यमंत्रीः लाडकी बहीण योजना’, या योजनेचा लाभ देण्याबाबत होत असलेल्या नोंदणीचा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते.

 बैठकीत माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार १३० जणींची नोंदणी झाली आहे. त्यात १ लाख ९९ हजार ८४२ जणींची नोंदणी ही ऑनलाईन तर ३ लाख १३ हजार २८८ जणींची नोंदणी ऑफलाईन झाली आहे. ही नोंदणी दि.३१ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असून अधिकाधिक पात्र महिलांनी नाव नोंदणी करावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, प्रत्येक गावात लाभार्थ्यांच्या नोंदणीची टक्केवारी १०० टक्के होण्यासाठी योजनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी. गावात दवंडी द्यावी. लाभार्थी नोंदणी पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायत दप्तरी त्याची नोंद घ्यावी. लाभार्थी नोंदणीचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी तीन हजारांपेक्षा जादा लोकसंख्या असलेल्या गावात गुरुवार दि.२५, शुक्रवार दि.२६, शनिवार दि.२७ रोजी विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करावीत. महापालिका व नगरपरिषद हद्दीतही नोंदणीची कामे गतिने करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. प्रचार करुन नोंदणी सुविधा उपलब्धतेबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवावी,असेही त्यांनी सांगितले. 

 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, प्रत्येक गावात नोंदणीसाठी नारीशक्ती ॲप उपलब्ध व सक्रिय आहे. प्रत्येक गावात फॉर्म भरण्याची प्रक्रिया गतिमान करावी व लाभार्थी नोंदणीत आपला जिल्हा अग्रेसर असावा,असे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow