मुख्यमंत्री वयोश्री योजना, 26,27,28 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी - जिल्हाधिकारी
मुख्यमंत्री वयोश्री योजना
दि.२६,२७,२८ रोजी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी
शिबिराचे आयोजन करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.24(डि-24 न्यूज)- ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांचे दैनंदिन जीवन सामान्यपणे जगता यावे म्हणून सहाय्यभूत साधने व उपकरणे खरेदीसाठी अनुदान दिले जाते. या योजनेचे लाभार्थी निवडीसाठी दि.२६, २७ व २८ रोजी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी शिबिराचे आयोजन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.
‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा आढावा आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपाचे अपर आयुक्त रणजीत पाटील, सहा.आयुक्त समाजकल्याण पी.जी. वाबळे, डॉ. महेश लड्डा, मोमान खान, परिविक्षा अधिकारी व्ही.बी. विघ्ने, डॉ. अर्चना पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, या योजनेत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी होणे आवश्यक आहे. ही तपासणी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर, तसेच उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय अशा सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये दि.२६, २७ व २८ रोजी तपासणी शिबिर आयोजित करावे. ज्येष्ठ नागरिकांना त्याठिकाणी बोलावून तपासणी करुन त्यांना आवश्यक त्या सहाय्यभूत उपकरणे व साहित्यांबाबतची आवश्यकता नोंदवून त्यांची नावनोंदणी करण्यात यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
योजनेची माहितीः-
राज्यातील 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करणेसाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार इत्यादीद्वारे त्यांना मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे.
योजनेचे स्वरुप: योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थतता, दुर्बलतेनुसार सहाय्यभुत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. उदा. चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाईकल कॉलर इ. तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र, मन:स्वास्थ केंद्र, मनशक्ती केंद्र येथे सहभागी होता येईल.
*निधी वितरण :*
1. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येईल.
2. रु.3 हजार च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल.
पात्रतेचे निकष:
1. ज्येष्ठ नागरिक (ज्या ज्येष्ठ नागरिकांना दि.31 डिसेंबर 2023 ) अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्ती पात्र असतील.
2. आधारकार्ड, आधारकार्डसाठी केलेला अर्ज असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्याकडे आधारकार्ड नसेल आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्विकार्हाय असेल.
3. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा.
4. लाभर्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्ना रु.2 लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभर्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.
5. व्यक्तीने मागील 03 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकाद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामुल्या प्राप्त केले नसावे. याबाबतचे लाभर्थ्यांचे स्वंयघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. मात्र दोषापूर्ण, अकार्यक्षम उपकरणे इ.च्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाईल.
6. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचतखात्यात रु.3 हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येतील. सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन:स्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक (Invoice) प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
*आवश्यक कागदपत्रे :*
1. आधारकार्ड, मतदानकार्ड
2. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
3. पासपोर्ट आकाराचे फोटो -2
4. स्वयं-घोषणापत्र
5. शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
6. आरोग्य प्रमाणपत्र
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 65 वर्ष व त्यावरील वयोवृद्ध नागरिकांनी योजनेचा लाभ घेणेसाठी महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र व मनपा क्षेत्रातील आपला दवाखाना येथील कोणत्याही केंद्रावर दि. 5 ऑगस्ट 2024 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत परिपूर्ण अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण यांनी केले आहे.
What's Your Reaction?