राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम नागरिकांनी असावे जागरुक ग्राहक - शिल्पा डोलारकर

 0
राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम नागरिकांनी असावे जागरुक ग्राहक - शिल्पा डोलारकर

राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम

नागरिकांनी असावे जागरूक ग्राहक-शिल्पा डोलारकर        

छत्रपती संभाजीनगर, दि.24 (डि-24 न्यूज):- ग्राहक म्हणून नागरिकांनी नेहमी जागरूक असणे आवश्यक आहे. कोणत्याही वस्तूंची खरेदी अथवा सेवा घेतांना ग्राहकांचे हक्क अबाधित ठेवणे बंधनकारक असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्राहक संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष शिल्पा डोलारकर यांनी आज येथे केले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपायुक्त पुरवठा डॉ.अनंत गव्हाणे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकरी सामान्य प्रशासन संगिता राठोड, तहसीलदार रमेश मुंडलोड, वैधमापन अधिकारी शिवाजी मुंडे यांच्यासह ग्राहक संरक्षण परिषदेचे सर्व समिती सदस्य आणि शासकीय अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

श्रीमती डोलारकर म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्ती हा जन्मापासून मृत्यूपर्यंत ग्राहक असतो. ग्राहकाला योग्य मोबदल्यामध्ये सेवा आणि वस्तूची खरेदी करता येते. आणि ह्या दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध न झाल्यास याबाबत ग्राहकाला आपल्या या जागरूक राहणं ही आवश्यक आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना लेखी बिल किंवा पावती घेणे. उत्पादन, कालमर्यादा, किंमत, उत्पादन करणारी कंपनी इ. घटकाबाबत माहिती वस्तूवर छापणे उत्पादन कंपनीला बंधनकारक असून खरेदी करताना ग्राहकांनी ही बाब तपासून घेणे गरजेचे आहे.आता ऑनलाइन सेवा व खरेदी मध्येही ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. यासाठीही तक्रार दाखल करता येते. याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे श्रीमती डोलारकर यांनी यावेळी सांगितले. शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्राहक हक्क जाणीव जागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन तसेच शासकीय कार्यालय, रुग्णालय इतर खाजगी आस्थापना किंवा खाजगी उत्पादन करणाऱ्या विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ग्राहकांना उपलब्ध असणारे टोल फ्री क्रमांक, दर्शनी भागात प्रदर्शित करने आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.           

डॉ. गव्हाणे म्हणाले की, ग्राहकाच्या हक्काविषयी माहिती पुस्तिका जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत प्रकाशित करून ती प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्यात यावी. अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे यांनी ग्राहक आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून ग्राहक हक्क संरक्षण आयोगाने, व ग्राहक परिषदचे समिती सदस्य काम करत आहेत. ते आणखी लोकाभिमुख करावे,असे सांगितले.  

प्रास्ताविकामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी ग्राहकाच्या सुरक्षितता, उत्पादनाची माहिती, वस्तू निवडीचा अधिकार, तक्रार करण्याचा अधिकार, ग्राहकांच्या शिक्षणाचा अधिकार, आणि आपले स्वतःचे म्हणणे मांडण्याचा अधिकार याविषयीचे मार्गदर्शन केले. जिल्हा पुरवठा कार्याल मार्फत उत्कृष्ट काम करणारे निलेश राठोड, राहुल खेडकर, अमोल कासार, विजय शहाणे, शेख एजाज, अनुप कुलकर्णी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow