वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेड हुन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिरवी झेंडी दाखवत केला शुभारंभ...

नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवत केला शुभारंभ...
नांदेड, दि.26(डि-24 न्यूज) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ
नांदेड–मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ मराठवाड्याच्या रेल्वे प्रवासातील नवे पर्व असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
दक्षिण मध्य रेल्वे व मध्य रेल्वेच्या संयुक्त प्रयत्नांतून मराठवाड्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आज हुजूर साहिब नांदेड स्थानकावरून धावू लागली. महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागासाठी हा ऐतिहासिक टप्पा ठरला असून, या गाडीमुळे प्रवाशांना मुंबईशी जलद, सुरक्षित आणि आरामदायी दळणवळणाची सोय उपलब्ध होणार आहे.
नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार श्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार श्री विक्रम काळे, दक्षिण मध्य रेल्वेचे अप्पर महाव्यवस्थापक श्री सत्यप्रकाश, विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप, जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डीले, पोलिस अधीक्षक श्री अबिनाश कुमार, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी, पत्रकार, नागरिक आदीची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण होते.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या गाडीस मुंबई येथून व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारे हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतिक आहे. मुंबई ते नांदेड हे 610 किलोमीटरचे अंतर 9 ते 9.30 तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता 500 वरून 1440 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे 8 वरून 20 पर्यंत वाढवण्यात आले आहे. नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती 'वंदे भारत' एक्सप्रेसच्या माध्यमातून शक्य होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
खासदार श्री. अशोकराव चव्हाण म्हणाले की, “वंदे भारत एक्सप्रेस हा विकसित महाराष्ट्राकडे नेणारा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रवासाचा वेळ आणखी कमी झाला तर ही गाडी मुंबई सात तासांत गाठू शकेल. नांदेड विमानतळ सुरू होणे आणि या गाडीची सुरूवात, या दोन्ही गोष्टींमुळे नांदेडच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.”
खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले की, “ही गाडी नांदेडकरांसाठी अमूल्य भेट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार. प्रवाशांनी या आधुनिक सुविधायुक्त गाडीचा अवश्य लाभ घ्यावा.”
आमदार (MLC) श्री. विक्रम काळे म्हणाले की, “नांदेड–मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा. तसेच लवकरच नांदेड–बिदर व नांदेड–लातूर रेल्वेमार्ग पूर्ण होऊन नांदेड पुण्याला जोडले जाईल, अशी अपेक्षा आहे.”
तत्पूर्वी, दक्षिण मध्य रेल्वे चे अप्पर महाव्यवस्थापक श्री सत्य प्रकाश यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी सांगितले की, मराठवाडा भागातील नांदेड येथून राज्याची राजधानी मुंबईला जोडणारी ही पहिलीच वंदे भारत एक्सप्रेस आहे. यामुळे या दोन्ही स्थानकांमधील प्रवासाचा वेळ कमी होऊन जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल आणि या भागातील लोकांमधील संबंध दृढ होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी आभार मानले.
हुजूर साहिब नांदेड - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस नांदेड आणि मुंबई दरम्यानचे 610 किमी अंतर 9 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. या ट्रेनमध्ये 20 डबे आहेत (एक्झिक्युटिव्ह - 02, चेअर कार - 18) आणि एकूण 1440 आसन क्षमता आहे. ही ट्रेन सोयीस्कर ट्रेन वेळापत्रक प्रदान करते, ज्यामुळे नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद आणि इतर शहरांमधून दिवसा प्रवास करून दुपारी 12 वाजता मुंबईला पोहोचता येते आणि संध्याकाळी/रात्री परतता येते. ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस (बुधवार वगळता नांदेडहून आणि गुरुवार वगळता मुंबईहून) धावेल.
What's Your Reaction?






