बाधित मालमत्ताधारकांचे मोबदल्यासाठी आयुक्तांच्या बंगल्यासमोर आंदोलन...

बाधितांचे मोबदल्यासाठी आयुक्तांच्या बंगल्यासमोर आंदोलन...
7 दिवसांनंतर न्यायालयात जाण्याचा दिला इशारा, विनोद पाटील सह आंदोलकांना घेतले ताब्यात...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.26(डि-24 न्यूज) - आज सकाळी मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांच्या दिल्लीगेट येथील जलश्री बंगल्यासमोर रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या मालमत्ताधारकांनी विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. रस्ता रुंदीकरणासाठी आधी मालमत्तेचा मोबदला द्या, नंतरच कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून कारवाई करा, अशी मागणी करत, पाडापाडी मोहिमेतील बाधित मालमत्ताधारकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जी श्रीकांत मुर्दाबाद, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी, अशा घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिल्या. नागरिकांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि महापालिका प्रशासकांना देण्यात येणार आहे, तसेच 7 दिवसांत मागण्या मान्य न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
रस्ता रुंदीकरणाच्या मोहिमेला आमचा विरोध नाही. रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईत ज्यांच्या मालमत्ता पाडल्या, त्यांना मोबदला देण्यात यावा. नियमानुसार व कायद्याचे पालन करुन ही मोहिम राबवावी, यासह विविध मागण्या विनोद पाटील यांनी केल्या होत्या. तसेच २६ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा, व त्यांना शहरात फिरु न देण्याचा इशारा त्यांनी दिला होता. पाटील यांच्यासह बाधित मालमत्ताधारक आयुक्तांच्या बंगल्यासमोर जमा झाले, मात्र पोलीसांनी त्यांना आयुक्तांच्या बंगल्यासमोर आंदोलन करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत तंबू ठोकून आंदोलन सुरु केले. यावेळी त्यांनी आयुक्त जी श्रीकांत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. 'मोबदला आमच्या हक्काचा' या घोषणेचे फलक आणि आयुक्त जी श्रीकांत यांच्या फोटोवर फुली मारलेले पोस्टर हाती घेतलेले होते. यावेळी काही बाधितांनी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख, माजी उपमहापौर राजू शिंदे, माजी नगरसेवक युनुस पटेल, माजी नगरसेवक गोकुळ मलके, रवी कावडे आदींनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेत, त्यांना पाठिंबा दिला. यावेळी आंदोलनात मोठ्या प्रमाणात मालमत्ताधारक उपस्थित होते यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
What's Your Reaction?






