वाल्मीला गतवैभव प्राप्त करून देणार - मंत्री संजय राठोड
‘वाल्मी’ला गतवैभव प्राप्त करुन देणार...
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतली आढावा बैठक
छत्रपती संभाजीनगर, दि.26(डि-4 न्यूज) जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) ला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सुविधा विकास, पदभरती, विस्तार कामांसाठी 546 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून शासनस्तरावर पाठपुरावा, अधिक अनुदान मागणी व पदभरतीचे प्रस्ताव मार्गी लावू,असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज वाल्मी येथील आढावा बैठकीत केले.
वाल्मी येथे संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली. संस्थेचे महासंचालक वि.बा. नाथ, जलसंधारण विभागाचे अवर सचिव नितीन दुसाने, डॉ. राजेश पुराणिक, डॉ. गारुडकर, डॉ. दुरबुडे, डॉ. बोडखे, डॉ. राठोड तसेच सर्व प्रमुख प्राध्यापक आदी उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी वाल्मी संस्थेच्या सदस्थितीबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. वाल्मीने केलेल्या कामगिरीबाबत तसेच वाल्मीच्या आगामी काळात राबवावयाच्या उपाययोजना, सुविधा विस्तार विकास इ.बाबत माहिती सादर करण्यात आली. संस्थेतील पदांच्या अनुशेषाबाबत व नव्याने करावयाच्या पदभरतीबाबत माहिती देण्यात आली. वाल्मितील सुविधांच्या विकासासाठी व नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी एकूण 546 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
मृद व जलसंधारणाचे महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाल्मीची भुमिका महत्त्वाची आहे. दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने जलसंधारण ही काळाची गरज आहे. माती आणि पाणी या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी नव्या प्रणालींचा विकास करुन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत व सामान्य नागरिकांपर्यंत जलसंधारणाचे महत्त्व पोहोचवावयाचे आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याबाबतही नियोजन असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले. हे महत्त्व सांगण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पाणलोट यात्रा काढण्यात येणार असल्याचे श्री. राठोड यांनी नंतर पत्रकारांना सांगितले.
What's Your Reaction?